चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील श्री देवी नवलाई कालकाई ग्रामदेवता दोणवली या देवीचा जत्रा उत्सव रविवार ५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी अनेक पालख्या दोणवली ग्रामदेवतेला भेटण्यासाठी येणार आहेत.
श्री देवी नवलाई, कालकाई देवी जत्रा उत्सव म्हणजे सुखद व आनंदमय क्षण असतो. अनेक भाविक दूरवरून या उत्सवाला येतात आणि प्रत्यक्ष भेटीचा नेत्रदीपक सोहळा पाहतात. यावर्षी दोणवली ग्रामदेवतेला भेटण्यासाठी श्री देवी नवलाई, वाघजाई ग्रामदेवता पोसरे, श्री कडदोबा कालकाई ग्रामदेवता, मजरेकौंढर नवरतवाडी, श्री मानाई काळीश्री ग्रामदेवता गोंधळे, श्री नागार्जुन ग्रामदेवता कापरे, श्री वरदान ग्रामदेवता रामपूर, चव्हाणवाडी, श्री बाजीबुवा ग्रामदेवता, कालुस्ते या ग्रामदेवता येणार आहेत. श्री नवलाई कालकाई यजमान ग्रामदेवता, दोणवली ही यजमान ग्रामदेवता आहे. कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे- रात्री १०.३० वा. आमंत्रित ग्रामदेवतांचे आगमन आणि स्वागत, रात्री ११ वा. ग्रामदेवतांची शोडषोपचार पूजा व पालखी भेट आणि रात्री १२ वा. करमणुकीचा कार्यक्रम होईल. श्री राम नमन नाट्य मंडळ, काडवली गजवाडी येथील कार्यक्रम होणार आहे. जत्रा उत्सवाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री देवी नवलाई कालकाई ग्रामदेवता मंडळ, दोणवली आणि दोणवली ग्रामविकास मंडळ यांनी केले आहे.












