एसएसपीएम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या संशोधन कल्पनेला भारत सरकारचे पेटंट

 

‘गिअर डिझाईन ऑप्टिमायझेशन’ विषयातील संशोधनावर मोहोर

विद्यार्थ्यांच्या यशाने सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा
​कणकवली | प्रतिनिधी : 
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. या महाविद्यालयातील यांत्रिकी अभियांत्रिकी (Mechanical Engineering) शाखेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गिअर डिझाईन ऑप्टिमायझेशन’ या विषयावरील संशोधन कल्पनेला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाचे आव्हान पेलत मिळवलेल्या या यशामुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.
​या विद्यार्थ्यांचा संशोधनात सहभाग
महाविद्यालयाच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले आहे. यामध्ये कुमार साहिल संतोष पालव (बिळवस), कुमार भरत जिमाजी गावडे (चौकूळ), कुमार बाबुराव मोहन गावडे (पणदूर) आणि कुमार विठ्ठल मंगेश घाडी (साळगाव) यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी यंत्र विभाग प्रमुख प्राध्यापक सचिन विलास वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला संशोधन आराखडा तयार केला होता.

‘गिअर डिझाईन ऑप्टिमायझेशन’ हे संशोधन यंत्रसामग्रीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि ऊर्जा बचतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या विद्यार्थ्यांनी मांडलेली अभिनव संकल्पना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असल्याचे सिद्ध झाल्याने भारत सरकारने या कल्पनेला पेटंट देऊन गौरविले आहे. या प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांचे विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.
​स्टार्टअप संस्कृतीसाठी दिशादर्शक यश
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर म्हणाले की, “अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संशोधनाचा सराव व्हावा, तसेच त्यांच्या दैनंदिन वाचनातून येणाऱ्या नवनवीन कल्पनांचा वापर त्यांनी अभ्यासात आणि प्रोजेक्टमध्ये करावा, यासाठी आमचा नेहमीच प्रयत्न असतो. अशा प्रकारच्या यशाचा मोठा फायदा विद्यार्थ्यांमध्ये ‘स्टार्टअप संस्कृती’ रुजवण्यासाठी आणि त्यांना भविष्यातील यशस्वी उद्योजक बनवण्यासाठी होतो.”
​या यशाबद्दल सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, शिक्षक आणि जिल्ह्यातील शैक्षणिक स्तरावरून या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.