नाटळमध्ये १२० वर्षांनंतर ऐतिहासिक भक्तिसोहळा!

‘श्री रामेश्वर पंचायतन मूर्ती वज्रलेप व पुनःप्राणप्रतिष्ठा महोत्सव’;

* उद्या शोभायात्रेने प्रारंभ:११ व १२ एप्रिलला सोहळा

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या धार्मिक इतिहासातील एक सुवर्णक्षण जवळ आला आहे. नाटळच्या १२० वर्षांच्या इतिहासात प्रथमच श्री रामेश्वर मंदिर येथे “श्री रामेश्वर पंचायतन मूर्ती वज्रलेप व पुनःप्राणप्रतिष्ठा महोत्सव” आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, दिनांक ११ एप्रिल आणि रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी हा पवित्र आणि मंगलमय विधी सोहळा संपन्न होणार आहे. या महोत्सवाचा प्रारंभ १० एप्रिल रोजी भव्य शोभायात्रेने होणार असून, मुख्य सोहळा जगद्गुरू शंकराचार्य संकेश्वर पीठाधिपती यांच्या मंगल उपस्थितीत पार पडणार आहे.
सोहळ्याचे धार्मिक कार्यक्रम:

शनिवार, ११ एप्रिल २०२६: उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी ७:३० वाजता श्री रामेश्वर पंचायतन देवांना प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर गणहोम, शांतीहोम, प्रायश्चित्त आणि श्री गणेश पूजन पार पडेल. सकाळी ९ वाजल्यापासून प्राकारशुद्धी, देवता स्थापन आणि पूजन विधी होतील. दुपारी २ ते ३ या वेळेत सर्व उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दिवशी ‘श्री जगद्गुरु शंकराचार्य संकेश्वर पीठाधिपती’ यांची प्रार्थनीय उपस्थिती व आशीर्वचन लाभणार आहे.

रविवार, १२ एप्रिल २०२६: दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता प्राकारशुद्धी, आवाहन आणि अभिषेक होईल. सकाळी ९:३० वाजता मुख्य देवतेसाठी होम-हवन, तत्वन्यास आणि महापूजा संपन्न होईल. दुपारी १२ वाजता पूर्णाहुती, अभिषेक आणि नैवेद्य समर्पण होऊन ब्राह्मण आराधना केली जाईल. दुपारी २ वाजता पुन्हा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी धार्मिक विधींसोबतच दोन्ही दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
११ एप्रिल: सायंकाळी ६:३० वाजता ह.भ.प. श्री. शरद दत्तदास घागबुवा (नृसिंहवाडी) यांचे कीर्तन होईल. रात्री ९ वाजता स्वप्निल गोरे, राधा जोशी आणि प्रसाद शेवडे यांचा ‘भक्ती-भावगीतांचा’ सुमधुर कार्यक्रम होईल.

१२ एप्रिल: दुपारी ३ वाजता कोकरेवाडी-खरातवाडी यांचे ‘गजा नृत्य’ होईल. त्यानंतर गीतरामायण, नाटळ ग्रामस्थांची भजने आणि रात्री ८:३० वाजता ‘मराठी व्यावसायिक नाटक’ सादर केले जाणार आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी नाटळ ग्रामस्थ, पाहुणे आणि समस्त रामेश्वर भक्तवृंद यांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन श्री देव रामेश्वर माऊली नाटळ संस्था, मुंबई (रजि.) आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘एकीचे बळ, विकसित नाटळ’ हा मंत्र जपत संपूर्ण गाव या महोत्सवाच्या तयारीला लागला आहे.