ऑलिव्ह रिडले समुद्री कासावाची ९५ पिल्ले सुखरूप समुद्री अधिवासात

मालवण वायरी भूतनाथ किना-यावर स्थानिक कासव मित्र व कांदळवन कक्षाची मदत

मालवण | प्रतिनिधी : ऑलिव्ह रिडले समुद्री कासावाच्या ९५ पिल्लाना मालवण वायरी भूतनाथ किना-यावर स्थानिक कासव मित्र व कांदळवन कक्षाची मदतिने सुखरूप समुद्री अधिवासात सोडण्यात आले.

 

वायरी भूतनाथ समुद्र किनाऱ्यावर स्थानिक रहिवासी लतिका प्रशांत पाटकर यांना समुद्री कासव अंडी घालण्यासाठी समुद्र किनारी आल्याचे निदर्शनास आले. त्यांनी युथ बीट्स फॉर क्लायमेट या संस्थेला याची माहिती दिली. संस्थेचे सदस्य तेथे दाखल झाले. त्यांनी पाहिले असता ते ऑलिव्ह

रिडले या प्रजातीचे समुद्री कासव असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच कांदळवन विभागाला संपर्क करून याची कल्पना दिली.

 

बीच मॅनेजर मार्फत तिथून ११४ अंडी रेस्क्यू केली. अंड्यांच्या सुरक्षितेसाठी व देखभालीसाठी कांदळवन कक्षाच्या नियंत्रणा खाली त्या अंड्यांना वायरी भूतनाथ येथील समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये स्थलांतरीत करण्यात आले.

 

मालवण वायरी भूतनाथ समुद्र किनारा येथील कांदळवन विभाग – दक्षिण कोंकण (वनपरिक्षेत्र मालवण) समुद्री कासव अंडी उबवणी केंद्रामध्ये ऑलीव्ह रिडले या समुद्री कासवाची अंडी सुरक्षितरित्या सांभाळण्याचे काम चालू होते.

 

दिनांक १० एप्रिल रोजी जवळपास ५२ दिवसांच्या कालावधी नंतर ऑलिव्ह रिडले या समुद्री कासावाची एकूण ९५ पिल्ले रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अंड्यामधून बाहेर पडल्याचे तेथील स्थानिक रहिवासी कासव मित्र श्रीकांत माडये यांच्या निदर्शनास आले, त्यांनी त्वरित कांदळवन विभागाला संपर्क केला. स्थानिक कासव मित्रांनी कांदळवन कक्षाच्या मदतीने पिल्लांना सुखरुप समुद्रामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

 

या वेळी गणेश माडये, रसिका माडये, युगा माडये, संजू भगत, अमर मातोंडकर, विनय मातोंडकर, सौरभ मातोंडकर उपस्थित होते.