सावंतवाडीतील आदर्श क्रीडापटू मुन्ना सुभेदार यांचे निधन


​सावंतवाडी: चितारआळीतील रहिवासी आणि उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून परिचित असलेले उत्तम उर्फ मुन्ना रमाकांत सुभेदार (५८) यांचे रविवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडी शहरात, विशेषतः क्रीडा आणि तांत्रिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

​मुन्ना सुभेदार हे कळसुलकर हायस्कूलचे एक आदर्श खेळाडू म्हणून ओळखले जात. शालेय जीवनापासूनच क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपले नाव कमावले होते. केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर एक निष्णात तंत्रज्ञ म्हणूनही त्यांची ख्याती होती. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या इलेक्ट्रिकल कामात त्यांचा हातखंडा होता. बॅटरी बांधणीच्या कामातील त्यांच्या कौशल्यामुळे सावंतवाडी आणि परिसरातील वाहनधारकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते.
​त्यांच्या पश्चात तीन भाऊ, वहिनी, पुतणे आणि पुतणी असा परिवार आहे. मुन्ना सुभेदार यांच्या निधनाचे वृत्त समजताच चितारआळी परिसरात शोककळा पसरली. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.