राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील धोपेश्वर गिरमादेवी कोंड मुंबईकर आणि ग्रामस्थ मंडळाच्या वतीने कांदिवली मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत नवलादेवी बारसू संघावर मात करत चंडीकादेवी आंगले संघाने विजेतेपद पटकावत आई गिरमादेवी चषकावर नाव कोरले.
राजे शिवाजी मैदान चारकोप सेक्टर १ (मुंबई) येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील मुंबईस्थित संघानी भाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतीम सामना नवलादेवी बारसू विरूध्द चंडीकादेवी आंगले या दरम्यान रंगला. या सामन्यात आंगले संघाने विजेतेपद पटावले. बारसू संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील तृतीय क्रमांकासाठी बीसीसी नेरके तर चतुर्थ क्रमांक पार्थ ११ या संघाला निवडण्यात आले.
प्रथम विजेत्या संघाला रोख रूपये ५१ हजार व मानाचा चषक, उपविजेत्या संघाला रोख रूपये २५ हजार व तृतीय व चतुर्थ विजेत्या संघाना रोख रूपये ५ हजार व चषक देवून सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जगन्नाथ सौंदळकर संघ (चंडिका देवी आंगले), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून प्रथमेश आरेकर (पार्थ ११), स्पर्धेचा मालिकावीर म्हणून देवा कदम संघ (नवलादेवी बारसु) यांची निवड करण्यात आली. त्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गिरमादेवी कोंड मुंबईकर ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.










