जानवळे गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती

मनसे तसेच ग्रामस्थानी मानले सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागरचे आभार

गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील जानवळे फाट्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती तातडीने झाल्याने मनसे, गुहागर तसेच जानवळे ग्रामस्थानी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, गुहागर यांचे आभार मानले आहेत. तसेच या रस्त्याला पुरेसा निधी नसताना देखील दुरुस्तीच्या कामातून या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. शृंगारतळी-जानवळे फाटा मार्गे गावात जाणारा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा झाला होता रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले होते. पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले होते, दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता अक्षरशः जीवघेणा ठरत होता. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे काही दिवसांपूर्वी एस.टी. बस उलटण्याची घटना घडली होती. सुदैवाने देवाने मोठा अनर्थ टळला होता, मात्र भविष्यात गंभीर अपघात घडू शकतो असा इशारा देत या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी आग्रही मागणी करून रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मनसे आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांनी दिल्यानंतर तातडीने या रस्त्याची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर यांनी केल्याने सदरचा मार्ग सुस्थितीत झाला असून या रस्त्याची दुरुस्ती झाल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर येथील उप अभियंता,शाखा अभियंता, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी त्याचप्रमाणे कंत्राटदार यांचे आभार मानले आहेत.
या रस्त्याची दुरुस्ती करून जनतेला दिलासा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी, तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चिपळूण यांचेही आभार मानले आहेत. तसेच भविष्यात देखील या रस्त्याला चांगले डांबरीकरण होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी सांगितले.