​शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल करा आमदार दीपक केसरकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र



​सावंतवाडी । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा नवीन आराखडा हा कोकणासह विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करणारा असून, त्यात तातडीने बदल करण्याची मागणी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे लक्ष वेधले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.

​केसरकर म्हणाले की, नागपूरहून येणारा पर्यटक जर या महामार्गामुळे थेट गोव्याला जाणार असेल, तर तो कोकणच्या पर्यटन व्यवसायावर मोठा अन्याय ठरेल. कोकणात स्वतःचे उत्कृष्ट समुद्रकिनारे आणि बंदरे असताना महाराष्ट्रातील माल आयाती-निर्यातीसाठी गोव्याच्या बंदराचा वापर का व्हावा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा मार्ग आजऱ्यावरून थेट रेड्डी बंदराला जोडला जावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी सुचवले आहे की, आंबोली, फणसवडे आणि केसरी खालून बोगदा काढून हा मार्ग नेल्यास ‘इको सेन्सिटिव्ह’ झोनला कोणताही धोका पोहचणार नाही. तसेच, या महामार्गाचा एक फाटा तिलारी मार्गे उत्तर गोव्याला आणि दुसरा दक्षिण गोव्याला जोडल्यास चंदगड व दोडामार्ग तालुक्यात पर्यटनाला मोठी चालना मिळेल.
​या विषयावर आपण पालकमंत्री नितेश राणे आणि चंदगडच्या आमदारांशी चर्चा केली असून, केवळ चंदगडवरून हा मार्ग गोव्याला जोडण्याऐवजी तो कोकणच्या हिताचा कसा ठरेल, याकडे शासनाने लक्ष द्यावे, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.