दापोलीत बनावट ‘पॉलिकॅब’ वायरची विक्री; १.३८ लाखांचा मुद्देमाल जप्त

दापोली:
दापोली बाजारपेठेतील एका नामांकित दुकानातून नामवंत कंपनीच्या नावाखाली बनावट इलेक्ट्रिकल वायरची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दुकानदारावर कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून, सुमारे १ लाख ३८ हजार ७६० रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला आहे.

हैद्राबाद येथील नागेश्वरराव कृष्णमुर्ती नंदीगामा (वय ४६) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोली बाजारपेठेतील ‘निर्णय ईलेक्ट्रीकल्स’ या दुकानाचा मालक सुनील अनंत पालटे (वय ५८, रा. उदयनगर, दापोली) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ‘POLICAB’ (पॉलिकॅब) या नामांकित कंपनीच्या नावाचा गैरवापर करत होता.
बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६:५० वाजेच्या सुमारास या दुकानावर छापा टाकला असता, तिथे पॉलिकॅब कंपनीच्या ओरिजनल वायरसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या नकली वायर्स विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत खालील प्रमाणे बनावट वायर्सचे बॉक्स जप्त केले आहेत:
• १.० S.Q MM वायर्स: २,६५० रुपये किमतीचे एकूण ६ बॉक्स (एकूण किंमत १५,९०० रुपये).
• १.५ S.Q MM वायर्स: ३,६०० रुपये किमतीचे एकूण ३१ बॉक्स (एकूण किंमत १,११,६०० रुपये).
• २.५ S.Q MM वायर्स: ५,६३० रुपये किमतीचे एकूण २ बॉक्स (एकूण किंमत ११,२६० रुपये).

आरोपी सुनील पालटे याने मूळ कंपनीच्या मालकी हक्कांचे (Copyright & Trademark) उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कॉपीराईट ट्रेडमार्क ॲक्ट १९५७ (सुधारीत अधिनियम १९८४ आणि १९९४) च्या कलम ५१ व ६३ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.