तरळे येथील खार जमीन विकास विभागाचे कार्यालय देवगड येथे तातडीने स्थलांतरित करा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे
यावेळी त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की,
माझ्या मतदारसंघातील देवगड तालुका समुद्र किनारी वसलेला असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात खाडीचा भाग असून, भरतीच्या वेळी पाणी खाडीमार्गे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये घुसते व फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. परंतु याबाबत काही उपाययोजना करावयाच्या असतील तर देवगड तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थ यांना सुमारे ४० ते ५० कि.मी. अंतरावरील कणकवली तालुक्यातील मौजे तळेरे येथील खारजमीन विभागाच्या कार्यालयामध्ये यावे लागते. एवढ्या लांब असलेल्या कार्यालयामध्ये येणे-जाणे कठीण असल्याने देवगड तालुक्यातील खारभूमी विकास विभागाकडील कामे वेळेवर होत नाहीत. व जनतेला न्याय मिळत नाही.
कणकवली तालुक्यामध्ये खारभूमी क्षेत्र अत्यंत अल्प प्रमाणात असल्याने तेथे कार्यालयाची तेवढी गरज नाही. मौजे तळेरे येथील कार्यालय देवगड येथे स्थलांतरीत करण्यासाठी कुणाचाही विरोध नाही. याबाबत देवगड येथील ग्रामस्थांची बऱ्याच वर्षांची मागणी आहे. तरी सोईच्या दृष्टीने मौजे तळेरे येथील खारभूमी विकास योजनेचे कार्यालय देवगड तालुक्यामध्ये त्वरीत स्थलांतरीत करावे व देवगडवासीयांची बरेच वर्षांची मागणी पूर्ण करावी, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे










