गौरी-गणपती सणात कोकणातील प्रवाशांसाठी शासनाने एवढ्या गोष्टी अवश्य कराव्या

चिवेली येथील रमेश शिर्के यांनी मांडल्या चाकरमान्यांच्या व्यथा

संतोष कुळे | चिपळूण : आपल्या महाराष्ट्र राज्यात सध्या डबल ट्रीपल इंजिन सरकारे असून सुध्दा मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली अनेक वर्षे अपूर्णावस्थेतच आहे. प्रत्येक होळी, गणपती यासारख्या सणापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशा अनेक वर्षे केवळ घोषणाच होत आहेत. यंदाच्या गौरी-गणपती सणाला अजून सुमारे दीड महिन्यांचा कालावधी बाकी आहे. या काळात शासनाच्या संबंधित विभागाने कोकणात जाणा-या येणा-या प्रवाशांच्या सोईसाठी पुढील बाबींची युध्द पातळीवर पूर्तता करावी. अशी आपल्या प्रसिद्ध निवेदनातून चिवेली पंचक्रोशी विकास मंडळाचे प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के यांनी केली आहे.

त्यांनी प्रसिध्द पत्रकात काही महत्वाचे मुद्दे नमूद केले आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पळस्पे ते खारेपाटण या सुमारे साडेचारशे कि. मीटर लांबीच्या रस्त्यावर जागोजागी पडलेले लहान- मोठे खड्डे पक्क्या पध्दतीने त्वरित बुजविण्याचे काम सुरु करावे.

दि. १५ ते २० व २४ ते २६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत या महामार्गावरील अवजड वाहानांची वहातूक पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी.
मुंबई ते सावंतवाडी या सुमारे ५०० कि. मीटर लांबीच्या रस्त्यावर प्रत्येक ३५/४० कि. मीटर अंतरावर तात्पुरत्या स्वरुपाची महिला व पुरुष अशी स्वतंत्र प्रसाधनगृहे उभारण्यात यावीत. गणेशोत्सव काळात खाजगी वाहनाने प्रवास करणा-या प्रवाशांची प्रसाधनगृहा अभावी फार मोठी गैरसोय होते. विशेषतः महिला, मुली व ज्येष्ठ नागरिकांची फार मोठी कुंचबणा होते. खाण्या-पिण्याची व्यवस्था खाजगी वाहनधारक आपापल्या वहानात करु शकतील. या काळात कुठेही हॉटेल, ढाबा, टपरीवर सुध्दा थांबण्याची सोय नसते. खाजगी वाहने रस्त्यात कोठेही सुरक्षित ठिकाणी थांबून आपले जेवण, नाष्टा करु शकतील. मात्र नैसर्गिक विधीसाठी प्रसाधनगृह ही एक अत्यावश्यक बाब आहे..
वाहातूक कोंडी टाळण्यासाठी रांगेची शिस्त मोडून ओव्हरटेक करणा-या वाहन चालकांचे वाहन रांगेतून सरळ बाहेर काढून बाजूला उभे करावे. बेशिस्त व लेनची शिस्त मोडणा-यांमुळेच प्रचंड वहातूक कोंडी होते. यासाठी जागो जागी जेथे वहातूक कोंडी होणारी ठिकाणे आहेत. अशा सर्वठिकाणी वाहातूक पोलीस तैनात करुन अशा बेशिस्त वाहन चालकांना जागेवरच कठोर शासन करण्यात यावे.

वरीलप्रमाणे व्यवस्थांची व अन्य माहिती देणारे फलक जागो जागी लावण्यात यावेत. वाहनदुरुस्ती, पंक्चर काढणे या व्यवस्था दर ३०/४० कि. मीटरवर असावी. मार्गदर्शक फलक मोठे व सुस्पष्ट असावेत. वरील सूचनाप्रमाणे व्यवस्था झाल्यास निदान गौरी-गणपती सणासाठी तरी लोकांचा प्रवास थोडा सुखकर होईल.. मग हा राष्ट्रीय महामार्ग आणखी अर्धा-पाव वर्षांनी झाला तरी प्रवाशी निदान गणपतीचा प्रवास समाधानकारक झाला यासाठी मनातून सुखावतील, असे रमेश शिर्के यांनी प्रसिध्द पत्रकातून म्हटले आहे. हे पत्रक त्यांनी सर्वांच्या भावना जाणून प्रसिध्द केले आहे.