नातवासह दोन आरोपी मीरा – भाईंदरमधून ताब्यात.!
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दमदार कामगिरी.!
कणकवली : तालुक्यातील ओटव ओटववाडी येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन आरोपींना मीरा – भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची देखील पोलिसांनी दिली.
मंगळवारी (२२ एप्रिल) सकाळी ११:३० वा. च्या सुमारास सुवर्णा नारायण रावले (वय ६६) या घरात स्वयंपाक करत असताना त्यांचा नातू साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २३, रा. विरार पूर्व) व त्याच्या एका मित्राने घरात प्रवेश केला. दोघांनी सुवर्णा रावले यांच्याशी झटापट करून त्यांचे तोंड दाबत त्यांना बेडरूममध्ये नेले. त्यानंतर गळ्यातील १ लाख रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोन्याची चेन तसेच ४५ हजार रुपये किमतीची साडेनऊ ग्रॅमची सोन्याची चेन असा एकूण १ लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. साईल हा सुवर्णा रावले यांच्या मुलीचा मुलगा असून घराबाहेर पळताना बेडरूमच्या खिडकीतून तो दिसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढला. या प्रकरणी पोलीस अधिक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, श्री. डिसोजा यांच्या पथकाने केली. आरोपीना ताब्यात घेतल्यानंतर कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.












