खेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भोस्ते घाटात मुंबई-गोवा महामार्गावर कोकण दर्शन करून मुंबईत परतणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलर बसचा अपघात झाला.
मुंबईच्या दिशेने जाणारी ही टेम्पो ट्रॅव्हलर बस भोस्ते घाट उतरत असताना तिचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसने समोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या हुंडाई एक्स्टर कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.
या अपघातात कार महामार्गालगतच्या खड्ड्यात जाण्यापासून थोडक्यात बचावली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस तसेच कशेडी महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केली.












