गुणवत्ता विकासासाठी मुख्याध्यापकांनी विशेष प्रयत्न करावेत!- डॉ. विलास पाटील जिल्हास्तरीय मुख्याध्यापक कृतिसत्राला लाभली मान्यवरांची उपस्थिती, ९ मुख्याध्यापकांना गुणवंत पुरस्कार प्रदान

चिपळूण (वार्ताहर) : शिक्षण ही शर्यत नसून मॅरेथॉन आहे. शिक्षण हे बिघडण्यापूर्वी घडविण्याचे काम आहे. शिक्षण मोठं होण्यासाठी नसून चांगलं होण्यासाठी असून ते मनाचा उत्सव आहे. शिक्षणातील मानवी घटक, भौतिक घटक, अध्ययन अध्यापन कार्य, शैक्षणिक उपक्रम, शालेय परीक्षा व शैक्षणिक व्यवस्थापन या सर्व घटकांच्या उत्कृष्टतेची पातळी गाठणे म्हणजे शैक्षणिक गुणवत्ता असून शालेय गुणवत्ता विकासासाठी मुख्याध्यापकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन ‘सारथी’ कार्यकारी अधिकारी व कोल्हापूर डायटचे माजी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.
रत्नागिरी येथे माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद, रत्नागिरी व रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी आयोजित एक दिवसीय जिल्हास्तरीय कृतीसत्रात ‘आजचे शैक्षणिक वास्तव व मुख्याध्यापकांची भूमिका ‘ या विषयावर मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कृतीसत्राला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उद्योजक आर. डी. सामंत व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित उपस्थित होते. यावेळी कृतिसत्राचे उदघाट्न पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांचे वडील अण्णासाहेब सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हा मुख्याध्यापक संघाने प्रकाशित केलेल्या ‘नंदादीप’ कार्य अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी नवीन संचमान्यता निकषामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या शाळा वाचविण्यासाठी व अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी या कृतीसत्रात सहाय्यक शिक्षण संचालक (कोल्हापूर विभाग) डॉ. गणपती कळमकर यांनी ११ वी प्रवेश कार्यप्रणाली या विषयावर, ‘सारथी ‘चे कार्यकारी अधिकारी डॉ. विलास पाटील यांनी आजचे शैक्षणिक वास्तव व मुख्याध्यापकांची भूमिका या विषयावर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी ताणतणाव आणि व्यवस्थापन या विषयावर आणि राज्य मुख्याध्यापक महामंडळ कोषाध्यक्ष संदेश राऊत यांनी रजा नियम व अनुषंगिक कार्यवाही या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील नऊ मुख्याध्यापकांना गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये संदेश कोकाटे (चिपळूण), रामचंद्र कापसे (मंडणगड), प्रमोद गमरे (दापोली), पोपट जगताप (खेड), पांडुरंग हासबे (गुहागर)रिझवान अ.नबी कारिगर (संगमेश्वर)मुलाणी चांदसाहेब (लांजा), मधुकर थुळ (रत्नागिरी ) व सौ. राजश्री नारे (राजापूर) यांचा समावेश आहे. यावेळी ए. आय. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष म. बा. चव्हाण, प्रमोद दळी, जिल्ह्यातील ३७ हजार विद्यार्थ्यांची ए.आय. व सायबर सेक्युरिटीची मोफत परीक्षा घेणारे युनिटेक कॉम्पुटर एज्युकेशन सेंटरचे जहूर बोट यांच्यासह कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनातील योगदानाबद्दल विद्यासमिती सचिव अनंत साठे, सदस्य श्रीशैल्य पुजारी, अनंत साळवी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर,माध्यमिक पतपेढीचे चेअरमन सागर पाटील,राज्य महामंडळ सहसंपादक रमेश तरवडेकर, संघाचे सहसचिव कल्पेश दळवी, खजिनदार सुनील देशमाने यांच्यासह जिल्हा व तालुका संघटना पदाधिकारी तसेच जिल्ह्यातील मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लांजा तालुकाध्यक्ष संदेश कांबळे यांनी केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष अय्युब मुल्ला यांनी तर आभार जिल्हा सचिव महेश पाटकर यांनी मानले.