वैभववाडी प्रतिनिधी :
वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वैभव मोरे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी वैभववाडी पोलिसांनी संशयित आरोपी संदीप तानवडे व गणपत तानवडे या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
कोकिसरे नारकरवाडी येथील संदीप तानवडे यांचा मुलगा शिवांश संदीप तानवडे वय वर्ष 8 हा गेले बरेच दिवस आजारी होता. त्याच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. बेंगलोर येथे ही त्याच्यावर उपचार करण्यात आले होते.
रविवारी शिवांश याला सकाळपासूनच श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्याला श्वास घेण्यात अडथळा येत होता. सायंकाळी 6 च्या सुमारास डॉक्टरांना या संदर्भात माहिती देण्यात आली. डॉ. वैभव मोरे व त्यांचे सहकारी पेशंट येणार म्हणून वाट पाहत होते. पेशंट ग्रामीण रुग्णालयात येताच कर्मचारी व डॉक्टरांनी त्याला कृत्रिम रित्या ऑक्सिजन देण्यात आला. मात्र त्याची हालचाल होत नव्हती. त्यानंतर सदर पेशंटचा तात्काळ ईसीजी काढला. त्यामध्येही त्यांना कोणतीच हालचाल दिसली नाही. त्यानंतर खात्री करून डॉ. वैभव मोरे यांनी शिवांशाचे वडील संदीप तानवडे यांना पेशंटचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हे ऐकताच संदीप तानवडे यांना प्रचंड राग आला व त्यांनी डॉक्टर मोरे यांच्या कानाखाली लगावली. व अर्वाच भाषेत शिवीगाळ केली. त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या दरवाजाच्या काचा फोडून सरकारी मालमत्तेचे नुकसान केले.
रुग्णालयात अजून कोणता अनुचित प्रकार घरून घडू नये म्हणून या घटनेची माहिती वैभववाडी पोलिसांना देण्यात आली. वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री जाधव व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्या ठिकाणी संदीप तानावडे व त्याचे वडील गणपत तानवडे हे संबंधित डॉक्टरांना शिवीगाळ करून अंगावरून धावून जात होते. रुग्णालय पेटवून टाकूया अशी धमकी देत होते. पोलिसांनी त्यांना शांत करून बाजुला केले.
घडलेला प्रकार डॉ. मोरे यांनी पोलिसांना सांगत वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. वैभववाडी पोलिसांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद केला आहे व घटनेचा अधिक तपास करीत आहेत.








