पुण्यात ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा; अभियंता महिलेची २.३ कोटींची फसवणूक

 

हडपसरमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर आमिषाला बळी
फसव्या अॅपद्वारे बनावट नफा दाखवून जाळ्यात ओढले

पुण्यात ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा सायबर घोटाळा उघडकीस आला आहे. हडपसर परिसरातील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्या महिलेला जास्त परताव्याचे आमिष दाखवून २.३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. मेसेजिंग अॅपवरील ग्रुपद्वारे आरोपींनी तिचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला थोडा नफा देऊन नंतर मोठी रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त करण्यात आले. सध्या सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


पुणे : हडपसरजवळील शेवाळवाडी परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्या महिलेला ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात अडकवून २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान तब्बल २.३ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तक्रार पडताळणीनंतर सोमवारी एफआयआर नोंदवला, अशी माहिती प्रहार डिजिटल वृत्तानुसार समोर आली आहे.

वरिष्ठ निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हडपसरमधील एका आयटी कंपनीत कार्यरत असून ती गेल्या सात-आठ महिन्यांपासून रजेवर होती. दरम्यान, एका मेसेजिंग अॅपवरील ग्रुपमध्ये तिचा मोबाईल नंबर जोडण्यात आला आणि त्या ग्रुपमध्ये शेअर-ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळत असल्याचे दाखवण्यात आले.

ग्रुपमधील सदस्य सतत ट्रेडिंग टिप्सबद्दल चर्चा करत होते आणि ग्रुप अॅडमिनचे आभार मानत होते, त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. त्यानंतर तिने अॅडमिनशी संपर्क साधला आणि शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. अॅडमिनने तिला मदत करण्याचे सांगत एक ट्रेडिंग अॅपची लिंक पाठवली.

महिलेने अॅप डाउनलोड करून सुरुवातीला कमी किमतीचे शेअर्स खरेदी केले. नंतर अॅडमिनने तिला महागडे शेअर्स आणि IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. विश्वास निर्माण करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी काही व्यवहार नफ्यात दाखवले आणि २०,००० रुपये परताव्याच्या स्वरूपात पाठवले.

यानंतर उच्च मूल्याच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीसाठी आरोपींनी पाच वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेने स्वतःची बचत तसेच नातेवाईकांकडून कर्ज घेऊन पैसे ट्रान्सफर केले. दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत तिने एकूण २.३ कोटी रुपये या खात्यांमध्ये पाठवले.

फसव्या ट्रेडिंग अॅपमध्ये ४ कोटी रुपयांहून अधिक नफा दाखवण्यात आला, मात्र महिलेने पैसे काढण्याचा किंवा शेअर्स विकण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी तिला थांबवले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.