ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातचे केले ठिय्या आंदोलन
पोलिसांच्या भूमिकेवर केला संशय व्यक्त
संशयितांना घातले जातेय पाठीशी
कणकवली : तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे एक धर्म प्रसाराचा कार्यक्रम सुरु असताना ग्रामस्थांनी तो सकाळी उधळला होता. त्यानंतर त्या ठिकाणी संबंधित धर्माच्या संदर्भात आढळलेले साहित्य व प्रार्थनेसाठी आलेल्या लोकांना देण्यासाठी ठेवलेले द्रव्य व कागदपत्रे पोलिसांनी परत केले. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदू समाजाने कणकवली पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांना धारेवर धरत जाब विचारला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलीस निरीक्षक तेजस नलवडे व ठाणे अंमलदार सुनील वेंगुर्लेकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करत संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला. संशयीताना पोलिसांचे संरक्षण कशासाठी? पोलिसांनी कुठलाही तपास न करता ताब्यात घेतलेले साहित्य परत का केले? पोलीस मॅनेज झाले आहेत का? संबंधित गुन्ह्या संदर्भात एक तक्रारदार तक्रार देत असताना दुसरीकडे साहित्य मागे देण्यामागे हेतू काय ? ही आमची फसवणूक आहे का ? आमच्या हिंदू समाजासाठी हा लढा लढत आहोत. चुकीच्या पद्धतीने पोलिसांनी आमची फसवणूक करू नये, असा इशारा संदीप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, अनुप वारंग, मिलिंद मेस्त्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिला.

त्यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या तणावामुळे कणकवली पोलीस ठाण्यात पोलीस उपविभागीय अधिकारी घनश्याम आढाव हे दाखल झाले. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. त्यामुळे हे प्रकरण आता चिघळणार असून याला कठीण वळण लागण्याची शक्यता आहे.













