या गावचे सुपुत्र सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांचा गावातर्फे नागरी सत्कार;
विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिरगाव (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील चाफेड -भोगलेवाडी प्रशालेला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सव समारंभ गुरुवार, ७ मे रोजी दुपारी २ वाजता माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय भोगले यांच्या अध्यक्षतेखाली प्रशालेच्या रंगमंचावर आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभाचे उद्घाटन देवगड पंचायत समितीचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून देवगड पं. स. चे उपसभापती अमोल लोके, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिणगारे, साळशी केंद्राचे केंद्रप्रमुख सुगंध तांबे, चाफेड सरपंच साहिल पांचाळ, उपसरपंच महेश राणे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष सत्यवान भोगले, पोलीस पाटील संतोष सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यादिवशी सकाळी ८ ते १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, १० ते ११ वा. आरती व तीर्थप्रसाद, ११ ते १२ वा. ज्येष्ठ नागरिक सन्मान, १२ ते २ वा. महाप्रसाद, दुपारी २ ते ५ वा. मुख्य कार्यक्रम (ईशस्तवन, स्वागत पद्य, पाहुण्यांचे स्वागत, हस्तलिखित प्रकाशन, जमीनदारांचा सत्कार, पहिला व शेवटचा माजी विद्यार्थी सन्मान, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख विजय भोगले यांचा गावातर्फे सत्कार, माजी शिक्षकांचा सन्मान, मान्यवरांचे मनोगत) आयोजित करण्यात आले आहेत.
तसेच सायं. ५ ते ६ वा. भोगलेवाडी व पिंपळवाडी ग्रामस्थांची भजने, ७ ते ८ वा. स्नेहभोजन, रात्रौ ८ ते ९ वा. माजी विद्यार्थ्यांचा सुसंवाद, ९ ते १२ वा. विविध गुणदर्शनपर कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर रात्रौ १२ नंतर सिद्धेश कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचे ट्रिक्सीनयुक्त “पृथ्वीकंकण” हे दशावतार नाटकप्रयोग सादर करण्यात येणारं आहे.
तरी या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय भोगले, सचिव महेश परब, खजिनदार प्रशांत राणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल्ल परब, मुख्याध्यापक दयानंद पांडे व ग्रामस्थांनी केले आहे.










