लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांत वैवाहिक वादाने घेतला हिंसक वळण
पत्नी गंभीर भाजली; आरोपी पतीचा पोलिसांकडून शोध सुरू
सोलापूरमध्ये एका विवाहित महिलेवर तिच्याच पतीने पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे दोन ते तीन महिने झाले असतानाच पती-पत्नीतील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत पत्नी गंभीर भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटना घडल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सोलापूर : नवराबायकोमधील किरकोळ वाद कधी कधी अत्यंत गंभीर वळण घेत असल्याचे प्रकार समोर येतात. सोलापूर शहरातील लोकमान्य नगर परिसरात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. पत्नीवर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत नर्गिस शेख या महिलेचा गंभीररित्या भाजल्याने उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 2024 मध्ये नर्गिस आणि फैजान शेख यांचा विवाह झाला होता. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये तणाव वाढला होता. काल रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास फैजान हा पत्नी नर्गिससोबत बोलत असताना अचानक दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या फैजानने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून लायटरच्या सहाय्याने पेटवून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. नर्गिसने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी आग विझवून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून जखमी नर्गिसची जबानी नोंदवण्याचे काम सुरू आहे. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, आरोपी फैजान शेख हा सध्या फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून घडला, वादाचे मूळ काय होते आणि या प्रकरणात आणखी कोणी सहभागी होते का याचा तपास पोलिस करत आहेत.










