दोडामार्ग: सुहास देसाई
दोडामार्ग तालुक्यात पाऊसाने थैमान तिलारी, घोटगे परिसरात मोठ मोठी झाडे रस्त्यावर उन्मळून पडली आहे जन जीवन विजे अभावी विस्कळीत झाले आहे मात्र पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वीज कडकडाटामुळे झरेबाबर (साईनगर) परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन तीन दिवस उलटले, तरीही वीज वितरण विभागाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गावात लग्नसराईचे वातावरण असतानाच वीज गायब झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
झाड पडून तारा तुटल्या, ग्रामस्थांनी श्रमदान केले तरीही वीज मिळेना
अशी अवस्था झाली आहे
पावसादरम्यान घनश्याम पारधी यांच्या घरासमोर असलेले फणसाचे मोठे झाड उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटल्या आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित झाला. ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन झाड तोडून विद्युत तारा बाजूला केल्या. मात्र, तीन दिवस उलटूनही वीज मंडळाने या तारांची जोडणी केलेली नाही.
*‘श्रीमंत तुपाशी आणि गरीब उपाशी’ अशी वीज मंडळाची नीती*?
या घटनेत धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी झाड पडले होते, तिथले कनेक्शन तोडून जवळच असलेल्या ‘क्रशर’चा वीज पुरवठा तातडीने सुरू करण्यात आला आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून अंधारात असलेल्या दहा कुटुंबांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. “श्रीमंत तुपाशी आणि गरीब उपाशी” असाच काहीसा प्रकार वीज मंडळाकडून सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
अधिकारी आणि वायरमन यांच्यात चाललीये ‘पासिंग द पार्सल’
वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, वायरमनकडे विचारणा केली असता ते अधिकाऱ्यांकडे बोट दाखवतात, तर अधिकारी वायरमनला सांगतो असे म्हणून वेळ मारून नेतात. या टोलवाटोलवीमुळे सामान्य नागरिक भरडले जात आहेत.
*लग्नाच्या गडबडीत पाणी आणि विजेविना हाल*
सध्या वाडीवर लग्नाचे कार्य सुरू आहे. हळदीचा समारंभ आणि लग्नाची धावपळ सुरू असतानाच वीज गायब झाल्याने पाहुणे मंडळींची मोठी गैरसोय झाली आहे. विजेअभावी पाणी पुरवठाही ठप्प झाला असून, जेवण बनवणे आणि इतर कामांसाठी ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. लग्नासारख्या शुभ कार्यात अंधार पसरल्याने वीज वितरण विभागाच्या कारभारावर मोठी नाराजी व्यक्त होत आहे.
तातडीने या भागाचा वीज पुरवठा सुरू न झाल्यास ग्रामस्थ आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहेत.












