विशेष ग्रामसभेत विरोधाचा ठराव मंजूर
सावंतवाडी । प्रतिनिधी :सोनुर्ली येथील ग्रामपंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता, एका खाजगी क्रशरसाठी वीज वितरण कंपनीमार्फत अकरा केव्ही (११ केव्ही) विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या मनमानी कामाच्या विरोधात सोमवारी झालेल्या सोनुर्ली ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत आक्रमक पवित्रा घेण्यात आला. जोपर्यंत ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेतली जात नाही, तोपर्यंत हे काम करू नये, असा एकमुखी ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
सोनुर्ली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सरपंच नारायण हिराप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसरपंच भरत गावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेत विद्युत वाहिनीच्या कामावरून जोरदार चर्चा झाली. ग्रामपंचायतीची कोणतीही पूर्वकल्पना किंवा ना हरकत दाखला न घेता ठेकेदाराकडून काम सुरू असल्याबद्दल ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
सदर विद्युत वाहिनी ज्या जमिनीतून आणि रस्त्याच्या कडेने जाणार आहे, त्या परिसरात ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात वावरणे असते. ही हायव्होल्टेज लाईन भविष्यात जीवितास धोकादायक ठरू शकते, असा धोका ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तसेच, या लाईनमुळे गावाचा कोणताही फायदा नसून केवळ खाजगी फायद्यासाठी लोकांच्या जमिनी धोक्यात आणल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला.
ग्रामपंचायत प्रशासनाने यापूर्वीच वीज वितरण कंपनी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. या कामात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा संशयही काही ग्रामस्थांनी व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीचे कारण देत ठेकेदार काम रेटत असला, तरी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
दरम्यान, या विषयावर जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, पोलीस प्रशासन आणि वीज वितरण कंपनीला लेखी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने हे काम त्वरित थांबवावे, अन्यथा गावाच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा सोनुर्ली ग्रामस्थांनी दिला आहे.












