IPL 2026 मध्ये नवा इतिहास; सर्व 10 संघांच्या खेळाडूंनी झळकावले शतक

विराट कोहलीच्या शतकानंतर IPLमध्ये ऐतिहासिक विक्रम

IPL 2026 हंगामात फलंदाजांनी विक्रमांची अक्षरशः बरसात केली आहे. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व 10 संघांमधील किमान एका खेळाडूने शतक झळकावण्याचा अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे. विराट कोहलीने KKRविरुद्ध शानदार शतक ठोकल्यानंतर हा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला. युवा खेळाडूंपासून अनुभवी दिग्गजांपर्यंत अनेक फलंदाजांनी दमदार कामगिरी करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. IPLच्या 19 वर्षांच्या इतिहासात असा विक्रम प्रथमच घडल्याने क्रिकेटविश्वात याची मोठी चर्चा सुरू आहे.


प्रहार डिजिटल : IPL 2026 हंगामात फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. यंदाच्या मोसमात प्रथमच सर्व 10 फ्रँचायझी संघांच्या किमान एका खेळाडूने शतक झळकावले आहे. विराट कोहली याने रायपूरमध्ये KKR विरुद्ध 60 चेंडूत 105 धावा करत आपले नववे IPL शतक पूर्ण केले आणि त्यानंतर हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला.

या खेळाडूंनी गाजवला IPL 2026 हंगाम

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन याने DC विरुद्ध नाबाद 115 धावा करत हंगामातील पहिले शतक झळकावले. त्यानंतर MI विरुद्धही त्याने नाबाद 101 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्स : क्विंटन डी कॉक, टिळक वर्मा आणि रायन रिक्लेटन यांनी शतके झळकावत संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. रिक्लेटनने SRH विरुद्ध अवघ्या 44 चेंडूंमध्ये शतक पूर्ण करत वेगवान विक्रम केला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : विराट कोहली याने KKR विरुद्ध शानदार शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला.

कोलकाता नाईट रायडर्स : फिन ऍलन याने DC विरुद्ध 47 चेंडूंमध्ये नाबाद 100 धावा केल्या.

लखनौ सुपर जायंट्स : मिचेल मार्श याने RCB विरुद्ध 49 चेंडूंमध्ये शतक झळकावत LSGसाठी सर्वात वेगवान IPL शतकाचा विक्रम केला.

पंजाब किंग्स : कूपर कॉनोली याने SRH विरुद्ध 107 धावांची खेळी करत IPLमध्ये शतक झळकावणारा सर्वात तरुण परदेशी खेळाडू होण्याचा मान मिळवला.

राजस्थान रॉयल्स : वैभव सूर्यवंशी याने SRH विरुद्ध केवळ 37 चेंडूंमध्ये 103 धावांची धडाकेबाज खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले.

दिल्ली कॅपिटल्स : केएल राहुल याने PBKS विरुद्ध नाबाद 152 धावांची खेळी करत हंगामातील सर्वोच्च धावसंख्या उभारली.

गुजरात टायटन्स : साई सुदर्शन याने RCB विरुद्ध 57 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा याने DC विरुद्ध नाबाद 135 धावांची तुफानी खेळी केली.