आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे सहकार्य
दांडी येथे ट्रांसफार्मर जळाल्याने वीज पुरवठा होता खंडित
तात्काळ कार्यवाही नंतर वीज पुरवठा सुरळीत
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर दांडी आवार येथील विद्युत रोहित्र ( ट्रांसफार्मर ) शुक्रवारी रात्री अचानक जळाल्याने या भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, लोकप्रतिनिधींचा तत्पर पाठपुरावा आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या युद्धपातळीवरील कामामुळे तात्काळ १०० केव्हीचे नवीन रोहित्र बसवून या परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
दांडी येथील ट्रांसफार्मर जळाल्याची माहिती मिळताच, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्याकडे या समस्येबाबत तातडीने पाठपुरावा करण्यात आला. नगर पालिकेतील भाजप गटनेत्या महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर आणि भाजप तालुका उपाध्यक्ष सन्मेष परब यांनी सतत संपर्कात राहून नवीन रोहित्र उपलब्ध करून घेतले.
दिवसभर महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. १०० केव्हीचे नवीन रोहित्र आणून ते सायंकाळपर्यंत कार्यान्वित करण्यात आले. कडक उन्हाच्या दिवसात वीज गेल्याने नागरिक हैराण झाले होते, मात्र तातडीने वीज आल्याने सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. राणे यांच्या माध्यमातून आज हे काम पूर्ण झाले याचा आनंद आहे असे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ऐन वेळी धावून येत अवघ्या काही तासांत वीज समस्या मार्गी लावल्याबद्दल दांडी आवार येथील स्थानिक नागरिकांनी राणे कुटुंबीय, स्थानिक पदाधिकारी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.













