पुणे येथील चार पर्यटक जखमी
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथे पर्यटन सफर करून माघारी जाणाऱ्या पर्यटकांच्या कारचा रविवारी सायंकाळी अपघात झाला. सायंकाळच्या सुमारास त्यांच्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार युवक जखमी झाले. अपघातात बलेनो गाडी पुढे जाऊन दगडी कंपाउंडला धडकली तर अर्टिगा कार 25 ते 30 फूट पुढे जाऊन एका झाडाला धडकली. या अपघातात अर्टिगा गाडीतील चार युवकांना दुखापत झाली असून त्यांच्यावर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर सुदैवाने बलेनो गाडीत कोणीही नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे भोर येथून नऊ युवक शुक्रवारी मालवणात पर्यटनासाठी आले होते. पर्यटनाचा आनंद लुटल्यावर आज सायंकाळी हे युवक अर्टिगा कारने (एम.एच. १२ टी.व्ही. १२०६) परतीच्या प्रवासासाठी निघाले. मालवण – कसाल मार्गावर कुंभारमाठ येथे अर्टिगा कार आली असता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बलेनो कारला जोरदार धडक बसली. सदर बलेनो कार (क्र. एम.एच. ०७ ए. जी. ८२०६) ही देवबाग येथील विवेक ताम्हणकर यांची असल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने बलेनो कारमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
तर अर्टिगा कारने बलेनो कारला धडक दिल्यावर अर्टिगा कार देखील सुमारे पंचवीस फूट पुढे जाऊन एका झाडाला धडकून थांबली. या अपघातात अर्टिगा कारमधील ओंकार राजाराम धोंडे (वय २२), सिद्धेश तुकाराम धोंडे (वय २२), श्रेयस पांडुरंग सडांबर (वय २२), रोहित संभाजी चव्हाण (वय २२) (सर्व रा. भोर, पुणे) या चार युवकांना डोक्याला, डोळ्याला, दुखापती झाल्या. तर इतरांना मुका मार लागला आहे.
अपघात घडल्यावर स्थानिक नागरिकांनी धाव घेत जखमीना रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तर यावेळी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते.













