बिअर शॉपीतील भांडण मिटवल्याचा राग; रत्नागिरीतील पाली येथे तरुणावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी (प्रतिनिधी): रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाली (मराठवाडी) येथे एका बिअर शॉपीसमोरील भांडण मिटवण्यास गेलेल्या व्यक्तीवर जुन्या रागातून काचेच्या बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या हाणामारीत प्रशांत रमेश राऊत (वय ४८ वर्षे, रा. पाली, मराठवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, चार अनोळखी इसमांवर भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ च्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसन्न रमेश राऊत (वय ३६ वर्षे, रा. पाली) यांचे गावातच चिकन विक्रीचे दुकान आहे. दिनांक १६ मे २०२६ रोजी त्यांचा भाऊ प्रशांत हा चिकनच्या दुकानात काम करत असताना, दुकानासमोरील ‘समर्थ बिअर शॉपी’मध्ये काही इसमांचे जोरदार भांडण सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. बिअर शॉपीचे मालक राजेश सावंत आणि चार अनोळखी इसमांमध्ये हा वाद सुरू होता. त्यावेळी प्रशांत राऊत याने मध्यस्थी करत सामोपचाराने ते भांडण मिटवले आणि सर्वांना शांत केले.

भांडण मिटवून काही वेळ उलटल्यानंतर, त्याच रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास प्रशांत राऊत हे गावातीलच ‘राधिका चायनिज सेंटर’वर चायनिज आणण्यासाठी गेले होते. चायनिज पार्सल घेऊन ते आपल्या मोटारसायकलवर बसत असतानाच, बिअर शॉपीबाहेर भांडण करणाऱ्या त्या चार अनोळखी इसमांपैकी एकाने मागून येऊन त्यांच्या डोक्यावर आणि हातावर काचेची बिअरची बाटली जोरात मारली. हा हल्ला इतका भीषण होता की प्रशांत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या जीवघेण्या हल्ल्यादरम्यान इतर तीन आरोपींनी फिर्यादीच्या भावाला (प्रशांत) अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, तसेच त्याला जबर धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिक धावून आले. गावातीलच अविनाथ सावंत (रा. पाली, मराठवाडी) यांनी तातडीने पुढे होऊन या मारहाणीतून प्रशांत यांची सोडवणूक केली. लोकांचा जमाव गोळा होत असल्याचे पाहून मारहाण करणारे चारही अनोळखी आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी प्रशांत राऊत यांना अविनाथ सावंत आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पाली येथे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर प्रसन्न रमेश राऊत यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी याप्रकरणी चार अनोळखी इसमांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) [गंभीर दुखापत करणे], ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी ग्रामीण पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर मार्गांनी तपास करत आहेत.