कोकणला ‘सिंधु-रत्न’ चा बुस्टर … !

कोकणला ‘सिंधु-रत्न’ चा बुस्टर … !

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.

सिंधु-रत्नमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करता येणाऱ्या आहेत. आजही कोकणातील पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यादृष्टीकोनातून विचार करता पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करणे अधिक सोपं होणार आहे. पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिंधु-रत्न मधून आर्थिक तरतूद होणारी असल्याने सहाजिकच त्याचा चांगला उपयोग या पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे. याबरोबरच मत्स्योद्योगाशी संबंधित मासळी बाजाराकरिता सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मत्स्य बीज उत्पादन केंद्र, मत्स्य साठवणुक विक्री केंद्र व मत्स्यालय उभारण्यासाठीही या योजनेतून काम करणे शक्य आहे. महत्वाची बाब म्हणजे त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हेच या सिंधु-रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. यामुळे या योजनेची अमंलबजावणी अधिक गतीमानतेने करणे सोईचे होणारे आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने कोकणाला सिंधु-रत्न योजनेतील ४०० कोटींची तरतूद हा सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ‘बुस्टर’ डोस दिला असच म्हणावं लागेल.

 

कोकणात सध्या हवामान अधिकच्या उन्हाने खुपच उष्ण झाले आहे. या उष्म्याचा परिणाम सहाजिकच सर्वत्र जाणवतो आहे. सकाळी १० वाजल्यापासून घराबाहेर पडणे मुश्किल अशी कोकणातील स्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्रात उन्हाळा कडक असलातरीही कोकणात उन्हात फिरल्यावर येणाऱ्या घामाच्या धारांनी जो थकवा जाणवतो तो कमालीचा असतो. अशा या वातावरणाचा परिणाम आपल्या कोकणातील काजू, आंबा या फळ बागायतींवर झालेला आहेच. यामुळेच एप्रिलच्या मध्यानंतर कडक उन्हाने आंबा मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणात आला जो आंबा मार्केटमध्ये येणारच नाही असे वाटले होते त्या आंब्याचे दर मे च्या पहिल्याच आठवड्यात खाली आले. अशातच कोकणातील काही राजकिय पक्षांनी मुंबईत आंब्याच्या नुकसान भरपाईसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील मोजक्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असे दाखवले गेले तरीही याच्या मागे माजी खासदार विनायक राऊत, खा.अरविंद सावंत, रत्नागिरीचे बाळ माने, उदय दुधवडकर अशा उबाठाच्या नेते, पुढाऱ्यांचाच भरणा होता. आंबा बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायलाच हवी यात कुणाचेही दुमत नाही. परंतु या आडून जर राजकारण होत असेल तर ते गैर वाटते या अशा वातावरणातच सिंधुदुर्गातील जनतेसाठी एक महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असणाऱ्या सिंधु-रत्न समृद्ध योजनेला दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्यमंत्रीमंडळ बैठकीत एक महत्वपूर्ण सकारात्मक निर्णय घेण्यात आला. सिंधु-रत्न समृद्ध योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देत असतानाच तब्बल ४०० कोटीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ निश्चितच कोकणातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. कृषि, पर्यटन, मत्स्योद्योग यामध्ये काम करणाऱ्या सामान्यांना यातून लाभ घेता येणार आहे. या सिंधु-रत्न च्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होणाऱ्या आहेत. कोकणातील तरूणांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेतला पाहिजे. या योजनेतून आपण काय करू शकतो त्याचा आपण कसा फायदा घेऊ शकतो याचा विचारही तरूणांनी करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडी सरकारच्याकाळात सिंधु-रत्न योजना गुंडाळण्यात आली होती. परंतु महायुतीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त ठरणारी ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली. आता तर या योजनेला तीन वर्षांची मुदतवाढ देत असतानाच ४०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यासाठी २०० कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी २०० कोटी अशा पद्धतीने आर्थिक तरतूदीचे नियोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधु-रत्न योजना पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ देऊन सुरू ठेवण्यात येईल त्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती. त्याची पुर्तताच महायुतीच्या सरकारने केली आहे. कोकणातील रायगड, जिल्ह्याच्या विकासाचा विचार आणि रायगड जिल्ह्यासाठी विकास निधीची तरतूद निश्चितपणे केली जाईलच. मात्र, सिंधु-रत्न योजनेच्या माध्यमातून जो विकास आराखडा तयार करण्यात येईल त्या विकास आराखड्यातील कामांची पुर्तता ठराविक कालमर्यादेत करण्यात येईल. विशेषत: पर्यटन क्षेत्रातील कामाला फारमोठा वाव असून या सिंधु-रत्नमुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करता येणाऱ्या आहेत. आजही कोकणातील पर्यटनस्थळांवर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यादृष्टीकोनातून विचार करता पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करणे अधिक सोपं होणार आहे. पर्यटन स्थळांच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सिंधु-रत्न मधून आर्थिक तरतूद होणारी असल्याने सहाजिकच त्याचा चांगला उपयोग या पर्यटन स्थळांवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी होणार आहे. याबरोबरच मत्स्योद्योगाशी संबंधित मासळी बाजाराकरिता सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. मत्स्य बीज उत्पादन केंद्र, मत्स्य साठवणुक विक्री केंद्र व मत्स्यालय उभारण्यासाठीही या योजनेतून काम करणे शक्य आहे. याबरोबरच मंजूर कामांची अपूर्णता असेल तर मार्च २०२७ पर्यंत सर्वच कामे मार्गी लागू शकतील. या योजनेत ज्या सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यातील महत्वाची बाब म्हणजे त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हेच या सिंधु-रत्न योजनेचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. यामुळे या योजनेची अमंलबजावणी अधिक गतीमानतेने करणे सोईचे होणारे आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने कोकणाला सिंधु-रत्न योजनेतील ४०० कोटींची तरतूद हा सिंधुदुर्ग, रत्नागिरीसाठी ‘बुस्टर’ डोस दिला असच म्हणावं लागेल. सिंधु-रत्न योजनेच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. तरूणांना रोजगाराच्या नव्या संधी या योजनेच्या माध्यमातून मिळतील. पर्यटन व्यवसायात असणाऱ्यांना आणि नव्याने पर्यटन व्यवसायात काम करणाऱ्यांना निश्चितपणे यातून नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विविध क्षेत्रात निर्माण होणाऱ्या संधीचा पुरेपूर लाभ उठवता आला पाहिजे.