स्थानिकांना घरबांधणी व दुरूस्तीसाठी वाळू उपलब्ध होणे आवश्यक

हातपाटीने वाळू काढणाऱ्या प्रामाणिक वाळू व्यावसायिकांच्या मी पाठीशी
आ. किरण सामंत यांची ग्वाही
प्रशासनाने दंड केल्यास भरण्याची दर्शविली तयारी
आ. किरण सामंत यांच्या भूमिकेचे तालुकावसीयांतुन स्वागत
राजापूर प्रतिनिधी: ग्रामीण भागात शासनाच्या योजनेतुन सुरू असलेली घरकुलांची कामे, तसेच पावसाच्या तोंडावर सुरू असलेली घरांची डागजुगी व बांधकामासाठी वाळु उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे जर का काही छोटे वाळु व्यावसायिक, महिला वर्ग अशा प्रकारे हातपाटीने वाळु काढून ती या बांधकामांना पुरवत असतील, आपली बांधकामे करत असतील तर त्याला आपला पाठिंबा आहे अशी रोखठोक भूमिका राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मांडली आहे.
जैतापूर खाडीतील अवैध वाळू उपशाबाबत झालेल्या तक्रारी नंतर एका खासगी वाहिनीशी बोलताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर आ. सामंत यांनी तालुक्यातील सामान्य जनतेची बाजू घेत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. आ. सामंत यांच्या या भूमिकेचे तालुका वासीयांनी स्वागत केले आहे.
या परिसरात हातपाटीच्या सहाय्याने किरकोळ स्वरूपात वाळू काढली जात असून ती स्थानिकांच्या घरबांधणीसाठी, घरकुलांसाठी आणि छोट्या बांधकामांसाठी वापरली जात आहे. सामान्य माणसाला बांधकामासाठी सहज आणि परवडणाऱ्या दरात वाळू उपलब्ध होत नसल्यामुळे काही लोक स्थानिक पातळीवर वाळू पुरवत आहेत. सामान्यांच्या घरांसाठी वाळू लागत असेल तर त्याला आपला पाठींबा असल्याची रोखठोक भूमिका आ. सामंत यांनी मांडली. अशा प्रकारच्या या वाळू चोरीला आपण प्रोत्साहन देत आहात का असा सवाल आ. सामंत यांना विचारला असता त्यावर उत्तर देताना आमदार सामंत यांनी ही चोरी नसून सामान्य लोकांच्या घरांच्या बांधकामासाठी लागणारी वाळू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्टपणे नमुद करत जर यासाठी शासन नियमानुसार दंड झाला तरी आम्ही तो भरू, मी जनतेच्या पाठीशी आहे अशी ठोस भूमिका यावेळी आ. सामंत यांनी मांडले.
आ. किरण सामंत यांच्या या रोख ठोक भूमिकेचे राजापूर वासीयांनी स्वागत केले असून आमचा आमदार कामगिरी दमदार अशी एकच पोष्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.