कणकवली : तळेरे येथील एस. टी. बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन महिला प्रवाशांचे दागिने आणि रोकड लांबविणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित बायजाबाई सुभाष देढे (वय ४२, रा. पेठवडगाव) हिची यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर निपाणीहून अटक करण्यात आलेल्या तिच्या अन्य तीन महिला साथीदारांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्यांना रत्नागिरी येथील कारागृहात पाठविण्यात आले आहे.
तळेरे बसस्थानकावर मंगळवार, १२ मे रोजी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या. मुंबईहून आलेल्या प्राची नारायण खांबल (रा. बोरिवली, मूळ रा. अरुळे, वैभववाडी) यांचे दागिने बसमध्ये चढताना चोरीस गेले होते. तर दुसऱ्या घटनेत तिलोत्तमा मणचेकर (रा. मणचे, देवगड) यांची पर्स चोरण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळी बायजाबाई देढे हिला पोलिसांच्या स्वाधीन केले. तर कर्नाटक राज्यातील निपाणी येथून अन्य चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये प्रेम पिंटू चौगुले (वय १९, रा. निपाणी) याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याच टोळीतील अटक करण्यात आलेल्या रुपाली पिंटू चौगुले (वय ३८), दीपाली चौगुले (वय ३५), सपना चौगुले (वय ३९) या तिघींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.













