सुमारे १५० हून अधिक असंघटीत कलावंतांची होणार मांदियाळी
सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्राचा वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि राज्यातील असंघटीत लोककलावंतांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने एका विशेष सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव’ या असंघटीत लोककलावंतांच्या महोत्सवाचा दिमाखदार सोहळा शुक्रवार, दिनांक २२ मे ते रविवार, दिनांक २४ मे २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.०० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृहात संपन्न होणार आहे.
या तीन दिवसीय भव्य महोत्सवामध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतून सुमारे १५० लोककलावंत सहभागी होणार असून, ते आपल्या पारंपरिक लोककलांचे सादरीकरण करणार आहेत. या माध्यमातून राज्यातील समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि लोकजीवनाचे वैभव प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण कलाप्रकारांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता करपल्लवी गोंधळी, बहुरुपी, धनगरी ओवी, हेळवी लोककलावंत, फुगडी आणि झिम्मा या पारंपरिक कलाप्रकारांनी कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी सायंकाळी ६ वाजता आदिवासी पाटा गायन, खेळे कळसूत्री बाहुल्यांचा, धिरो धिरो नृत्य, मयूर नृत्य आणि लैंगी बंजारा नृत्य यांसारखी दुर्मिळ व वैशिष्ट्यपूर्ण नृत्ये सादर केली जातील. महोत्सवाच्या अंतिम दिवशी, म्हणजेच रविवारी सायंकाळी ६ वाजता कोकणची लोककला परंपरा समृद्ध करणारे दशावतार नाटक, कोळी नृत्य, सोंगी मुखवटे, दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी आणि भारुड यांसारख्या प्रसिद्ध कलाप्रकारांसह स्थानिक लोककलांचे सादरीकरण प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.
हा संपूर्ण त्रिकालीन कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी पूर्णपणे विनामूल्य असून यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क असणार नाही. सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व कलारसिक नागरिकांनी या सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या असंघटीत लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्री. श्रीराम पांडे यांनी केले आहे.













