Nashik Robbery Case : सहा दरोडेखोर आणि ज्वेलर्समध्ये दरोड्याचा थरार, दोघांना पंजाबमधून बेड्या

न्यु समृध्दी ज्वेलर्सवर दरोडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहचले. तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात आली. त्यातून संशयित परप्रांतीय असल्याची माहिती मिळाली. नाशिक, पंचवटी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ५०० हून अधिक सीसीटीव्ही चित्रणाची पाहणी केली. त्यानुसार संशयित पंजाब येथील असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांकडून मोहालीत सलग तीन दिवस तपास करण्यात आला. पोलिसांनी हनिषकुमार महेंद्रसिंग (४७, रा. डेराबस्सी), रणजितसिंग दर्शनसिंग (५२, रा. बहादरपूर) यांना ताब्यात घेतले. दोघे सराईत गुन्हेगार आहेत.

असा रचला प्लॅन

दरोड्यामध्ये सहभागी असलेले आणि अटक केलेलं दोघे हे २०१० मध्ये अंबाला येथील जेलमध्ये होते. तिथेच त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि नंतर ते दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. दोघांनी दरोड्याचा प्लॅन केला. त्यांनंतर दोघे पंजाब येथून निघाले तेव्हाच त्यांनी त्यांचे मोबाईल हे बंद केले होते. पंजाबहून त्यांनी थेट मुंबई गाठले आणि मुंबईनंतर त्यांनी नाशिक गाठून येथे एक लॉजवरती ते वास्तव्यास होते.

पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील न्यू समृद्धी ज्वेलर्सची आणि परिसराची त्यांनी रेकी केली आणि दरोड्याचा प्लॅन रचला. त्यांनंतर त्यांनी शहर परिसरातूनच दोन दुचाकी चोरल्या आणि आपल्या इतर ४ साथीदारांसोबत दोन दुचाकीहून येत न्यु समृध्दी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकला.

नैना पगारिया यांचा कडवा विरोध अन दरोड्याचा बेत फसला

नियोजनाप्रमाणे ते दुकानात शिरलेही. परंतु, दुकानातील महिला व्यावसायिक नैना पगारिया आणि कामगार यांच्या धाडसी प्रतिकारामुळे दरोडेखोरांचा हा प्रयत्न फसला आणि संशयितांना पळून जावे लागले. विशेष म्हणजे संशयितांनी आपले भ्रमणध्वनी नाशिक गाठण्यापूर्वी बंद केले असतांना त्यांची ओळख पटवणे, शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते. मात्र नाशिक पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत दोघांना जेरबंद केले आहे.

नेमकी घटना काय घडली ?

नाशिक येथे हिरावाडी परिसरातील न्यु समृध्दी ज्वेलर्स येथे १५ मे रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास दुचाकींवर आलेल्या ६ अज्ञात आरोपींनी ज्वेलर्स दुकानात दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला होता. या मध्ये दुकान मालकाकडून होणारा विरोध पाहता हवेत गोळीबार करण्यात आला. मात्र दरोडेखोरांच्या मारहाणीत कर्मचारी जखमी झाला. जखमी कर्मचाऱ्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.