देवगड तारामुंबरी नाक्यावर दोन गटांत तुफान हाणामारी

पवनचक्कीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाद; वाहतूक काही काळ ठप्प

पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात; काही जण ताब्यात

देवगड : देवगड तालुक्यातील तारामुंबरी नाक्यावर पवनचक्कीकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहन मागे कोण घेणार, यावरून स्थानिक आणि पर्यटकांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पुढे दोन गटांतील तुफान हाणामारीत रूपांतर झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या घटनेमुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वादादरम्यान एका वाहनाची काच फोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमाव आक्रमक असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अतिरिक्त कुमक मागवावी लागली.

यानंतर पोलीस निरीक्षक बुवा अतिरिक्त पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणात काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असली, तरी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.