३ जूनपासून नियमित धावणार गाडी
रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून सध्या विशेष गाडी म्हणून धावणाऱ्या सूरत–मंगळुरू–सूरत विशेष रेल्वेला कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली आहे. ही गाडी आता क्रमांक १९०५७/१९०५८ सूरत–मंगळुरू जंक्शन–सूरत द्वैसाप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून नियमित धावणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
वेळापत्रक असे
गाडी क्रमांक १९०५७ सूरत–मंगळुरू जंक्शन द्वैसाप्ताहिक एक्स्प्रेस ३ जून २०२६ पासून प्रत्येक बुधवार व रविवारी सायंकाळी ७.३५ वाजता सूरत येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता मंगळुरू जंक्शन येथे पोहोचेल.
तर गाडी क्रमांक १९०५८ मंगळुरू जंक्शन–सूरत द्वैसाप्ताहिक एक्स्प्रेस ४ जून २०२६ पासून प्रत्येक गुरुवार व सोमवारी रात्री १०.३० वाजता मंगळुरूहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता सूरत येथे पोहोचेल.
कोकणातील अनेक स्थानकांवर थांबा
या गाडीला उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमळी, मडगाव, काणकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बिंदूर, कुंदापूरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
२० डब्यांची रचना
या एक्स्प्रेसमध्ये एकूण २० डबे असतील. त्यामध्ये २ टियर वातानुकूलितचा १ डबा, ३ टियर वातानुकूलितचे ७ डबे, स्लीपरचे ६ डबे, सामान्य प्रवाशांसाठी ४ डबे तसेच एसएलआर/डीचे २ डबे असणार आहेत.
कोकण रेल्वेच्या या निर्णयामुळे कोकणातील तसेच गुजरात व कर्नाटक दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.











