खरीपपूर्व तयारीला वेग द्या; रत्नागिरी जिल्ह्यासाठी कृषी विद्यापीठाचा हवामानाधारित सल्ला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात २९ मे ते २ जूनदरम्यान हवामानात बदल होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जना तसेच सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. १ आणि २ जून रोजी काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २६ ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

संभाव्य पाऊस आणि वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. नव्याने लागवड केलेल्या नारळ, सुपारी, आंबा व काजू कलमांना आधार द्यावा, तसेच खरीप हंगामापूर्वी भातशेतीतील बांधांची दुरुस्ती, तणनियंत्रण आणि स्वच्छता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणे, खते, शेणखत व कृषी निविष्ठांची उपलब्धता आगाऊ करून घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

खरीप भात लागवडीसाठी जमीन मशागत, रोपवाटिका तयारी आणि योग्य जातींच्या बियाण्यांची निवड करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. आंबा बागांमध्ये फळगळ आणि रोगप्रसार टाळण्यासाठी गळलेली फळे नष्ट करावीत, पिकलेली फळे सुरक्षितपणे काढून साठवावीत तसेच फळमाशी नियंत्रणासाठी शिफारस केलेले सापळे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नवीन आंबा, काजू, नारळ आणि सुपारी लागवडीसाठी खड्डे तयार करणे, खत व्यवस्थापन आणि योग्य अंतर ठेवून लागवड करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या आहेत.

याशिवाय पशुपालक आणि कुक्कुटपालकांनीही विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जनावरांना स्वच्छ आणि थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, लसीकरण पूर्ण करावे तसेच वादळी हवामानाच्या काळात जनावरे आणि पक्षी सुरक्षित गोठे किंवा शेडमध्ये ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. हा कृषी सल्ला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आला आहे.