दापोली (विशेष प्रतिनिधी) : दापोली-खेड मार्गावर रविवारी (31 मे) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमुळे टाळसुरे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा सुरेश साळवी (वय अंदाजे 48 वर्षे, रा. आष्टाची वाडी, टाळसुरे, ता. दापोली) या दापोलीकडून टाळसुरे शाळेच्या दिशेने जात होत्या. यावेळी दापोली-खेड मार्गावर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दरम्यान, अपघात घडताच संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे अज्ञात वाहन आणि चालकाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती तसेच उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे साळवी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. दापोली पोलिसांकडून अपघाताचा अधिक तपास सुरू असून फरार वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. तपासातून पुढे येणाऱ्या माहितीच्या आधारे अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.













