रत्नागिरीहून जेएनपीटीपर्यंत पहिली समर्पित कंटेनर रेल्वे जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे लक्ष्य
रत्नागिरी : प्रादेशिक लॉजिस्टिक्स व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि ग्राहकांशी संवाद वाढविण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाने (KRCL) ३ जून रोजी रत्नागिरी येथे उच्चस्तरीय व्यापार परिषद आयोजित केली. या बैठकीत मालवाहतूक क्षेत्रातील प्रमुख ग्राहक व भागीदारांशी संवाद साधत कोकण रेल्वेच्या अद्ययावत व आगामी मालवाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा होते. यावेळी कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रत्नागिरी व कारवार विभागाचे प्रादेशिक रेल्वे व्यवस्थापक तसेच केंद्रीय वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC) चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या परिषदेत रत्नागिरी परिसरातून मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर (JNPT) पर्यंत कंटेनर वाहतुकीच्या मोठ्या संधींवर विशेष चर्चा करण्यात आली. या आर्थिक संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करून जुलै २०२६ च्या पहिल्या आठवड्यात रत्नागिरीहून पहिली समर्पित कंटेनर रेल्वे सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
या उपक्रमाची व्यावसायिक व्यवहार्यता वाढविण्यासाठी केंद्रीय वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनने व्यापार भागीदारांना स्पर्धात्मक दर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
बैठकीत खत, अन्नधान्य आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीशी संबंधित अनेक व्यापार भागीदार सहभागी झाले होते. तसेच अजगाव बंदर आणि अंग्रे बंदराचे प्रतिनिधीही उपस्थित राहिले. यामुळे भविष्यातील सागरी आणि रेल्वे वाहतुकीतील समन्वय अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
कोकण रेल्वेने अलीकडील क्षमतावाढ, नव्या मालवाहतूक टर्मिनल्स आणि अधिक वेगवान, विश्वासार्ह व किफायतशीर लॉजिस्टिक्स सुविधा यांची माहिती उपस्थितांना दिली.
या उपक्रमामुळे रत्नागिरी ते जेएनपीटी कंटेनर वाहतूक सुरू होऊन प्रादेशिक पुरवठा साखळी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व भागधारकांनी पुढेही सहकार्य करण्याचे आवाहन कोकण रेल्वेने केले.











