सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, कणकवली तालुका, लोरे नं. १ गावचा सुपुत्र *कुमार प्रथमेश प्रकाश गुरव* याला राज्यस्तरीय गझल स्पर्धेचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.
स्मृतीशेष रमेश सरकाटे ह्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त राज्यभरातून नवोदित गझलकारांची गझल स्पर्धा आंबेडकरी साहित्य अकादमी मार्फत आयोजित करण्यात आली होती. त्याचा निकाल अकादमीच्या संस्थापक अध्यक्षा डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे ह्यांनी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी हॉल मध्ये आयोजित भव्य बक्षिस समारंभात १ जून रोजी संध्याकाळी घोषित केला. त्यामध्ये प्रथम पारितोषिक प्रथमेश गुरव, सिंधुदुर्ग, द्वितीय पारितोषिक अमेय तांदळजे, जालना व तृतीय पारितोषिक गिरीश खोब्रागडे, यवतमाळ ह्यांना प्राप्त झाले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक भाग्यलक्षी क्षीरसागर व शिवशंकर गोंड ह्यांना मिळाले.
भीमगीत स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रमा पवार, द्वितीय संतोषी झालटे, व तृतीय शैला हिवाळे ह्यांना मिळाले तर उत्तेजनार्थ सुजाता लहाने, व सुनीता अवस्रमोल ह्यांना मिळाले. हा पारितोषिक वितरण सोहळा सुप्रसिद्ध गझलकार डॉ.गणेश गायकवाड ह्यांचे हस्ते पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ.सदानंद देशमुख होते.
रमेश सरकाटे फक्त कवी आणि गझलकार नव्हते. तरुण वयातील नवोदित लेखकांना प्रोत्साहित करण्याचे व आश्वासक काम करण्याची संधी आंबेडकरी साहित्य अकादमीने दिली ही एक महत्वाची गोष्ट असल्याचे मत बक्षीस वितरण प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलतांना बारोमासकार डॉ.सदानंद देशमुख यांनी बोलतांना व्यक्त केले. या प्रसंगी बोलताना डॉ. गणेश गायकवाड म्हणाले की, सरकाटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्या वडिलांच्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य कार्याचा उजाळा करण्यासाठी केलेले हे कार्य महत्वपूर्ण आहे. रमेश सरकाटे हे मानवतावादाचा पुरस्कार करणारे व्यक्ती होते. स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराने सन्मानित करणे हे प्रेरणादायी असते यातून नवोदित कलाकारांना सातत्याने उमारी मिळत असते. असे विधान त्यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांनी केले. प्रास्ताविकात रमेश सरकाटे यांच्या संघर्षमय जीवनातील प्रसंग त्यांनी सांगितले. याप्रसंगी सुरेश साबळे, लक्ष्मण घुमरे यांनी रमेश सरकाटे यांच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी विचार पिठावर, प्रा. डॉ.संतोष आंबेकर, शिवाजी जवरे, माधुरी सरकाटे, करुणा सरकाटे, लक्ष्मण घुमरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी तर आभार प्रदर्शन करुणा सरकाटे यांनी केले. पारितोषिक वितरण समारंभानंतर गझल संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या गझल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुभाष मगर हे होते. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालक शिवाजी जवरे यांनी केले. या गझल संध्यामध्ये डॉ.विजयालक्ष्मी वानखेडे वंदना वैराळकर रमेश आराख, विशाल मोहिते, गोपाल मापारी, डॉ.गणेश गायकवाड यांनी सामाजिक आशयाच्या गझल सादर केल्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रविकिरण वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विलास सपकाळ, राजेश बावणे, अविनाश मुळे, डॉ.मंजुश्री खोब्रागडे, संतोष दाले, ह्यांनी परिश्रम घेतले.













