चारित्र्याच्या संशयातून पतीचे टोकाचे पाऊल
मंडणगड । प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथे एका २२ वर्षीय विवाहित महिलेचा तिच्याच पतीने कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (६ जून) दुपारी घडली. चारित्र्यावर संशय घेत पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वैशाली मंगेश पवार (वय २२) असे असून ती मंडणगड तालुक्यातील कोंडगाव येथील रहिवासी होती. आरोपी पती मंगेश निलेश पवार (वय २५) याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर हल्ला केला.
शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास वैशाली पवार घरासमोरील चिंचेच्या झाडाखाली उभी असताना आरोपीने तिच्यावर कोयत्याने वार केले. डोक्यावर गंभीर वार झाल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हल्ला इतका भीषण होता की तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक रामभाऊ सखाराम पवार यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेमुळे कोंडगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कौटुंबिक वाद आणि संशयाच्या भावनेतून घडलेल्या या दुर्दैवी घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे.











