मद्यप्राशन करत वारंवार शिवीगाळ व मारहाण
गुहागर प्रतिनिधी
दारू पिऊन वारंवार शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचा राग मनात धरून ६६ वर्षीय आईवर लोखंडी पाट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गावडेवाडी येथे घडली. या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून मुलाविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र शंकर गावडे (वय ४२, रा. पाटपन्हाळे गावडेवाडी, ता. गुहागर, सध्या रा. दिवा, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी पार्वती शंकर गावड़े (६६) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित राजेंद्र गावडे हा दारूच्या नशेत आईला शिवीगाळ, धमक्या व मारहाण करत असल्याने पार्वती गावडे यांनी यापूर्वी त्याच्याविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून राजेंद्रने ४ जून रोजी
सकाळी साडेआठच्या सुमारास घरात घुसून गाडीचा लोखंडी पाटा उचलला आणि आईच्या पायावर व शरीरावर मारहाण केली. हल्ल्यानंतर त्याने शिवीगाळ करत, “पोलिसांत तक्रार का देतेस?” अशी धमकी देत पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या मारहाणीत पार्वती गावडे गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी संशयिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत गंभीर दुखापत, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुहागर पोलिस पुढील तपास करत आहेत.













