कोकण रेल्वे भरतीच्या मुलाखती विशाखापट्टणमला!

 कोरे अन्याय निवारण समितीचा विरोध
 १३२ पदांच्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वेने १३२ पदांच्या भरतीसाठी १४ मे रोजी जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार उमेदवारांच्या मुलाखती ८ जूनपासून आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणम -ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीने तीव्र विरोध दर्शवला असून कोकणातील बेरोजगार तरुणांवर अन्याय होत असल्याचा आरोप समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केला आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात मुकादम यांनी म्हटले आहे की, कोकण रेल्वेची भरती प्रक्रिया महाराष्ट्राबाहेर नेण्यामागे परप्रांतीय उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न असल्याची शंका निर्माण होत आहे. कोकण रेल्वेच्या भरतीसाठी मुलाखती महाराष्ट्राबाहेर घेण्याची गरज काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. पूर्वीप्रमाणे मुंबई, बेलापूर, मडगाव आणि रत्नागिरी या केंद्रांवरच मुलाखती घेण्यात याव्यात, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीतर्फे करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील आणि विशेषतः कोकणातील बेरोजगार युवकांना दूरच्या राज्यात जाऊन मुलाखत देणे आर्थिकदृष्ट्या आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने अडचणीचे ठरणार आहे. भरती प्रक्रिया महाराष्ट्राबाहेर राबवून परप्रांतीय उमेदवारांना संधी देण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास त्याला संघटनेतर्फे तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही मुकादम यांनी दिला आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने भरती मुलाखतींची केंद्रे तातडीने कोकण विभागात निश्चित करावीत, अशी मागणी समितीने केली आहे.