कळंबस्ते येथील बैठकीत साखळी उपोषणाचा निर्धार
चिपळूण (प्रतिनिधी) : ग्राहक अथवा ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता गावोगावी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट वीज मिटरविरोधात सरपंच संघटनेने एल्गार पुकारला आहे. महावितरण कंपनीने ठेकेदार एजन्सीमार्फत सुरू केलेली ही प्रक्रिया तातडीने थांबवावी, यासाठी साखळी उपोषणाव्दारे आंदोलन छेडण्याचा एकमुखी निर्धार चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील स्मार्ट वीज मिटर प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी संघटनेचे तालुकाध्यक्ष व चिवेलीचे सरपंच योगेश शिर्के यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाव्दारे स्मार्ट वीज मिटरला सरपंच संघटनेचा कडाडून विरोध असल्याचे कळविले होते. हे वीज मिटर बसविण्यासाठी ग्राहकांची कोणतीही संमत्ती घेतलेली नाही. ग्रामपंचायतीची परवानगी नाही, त्यामुळे हे काम थांबवावे, अशी मागणी केली होती. सरपंच संघटनेच्या कळंबस्ते येथील श्री काळेश्वरी कांचनी सभागृह येथे नुकत्याच पार पडलेल्या बैठकीतही हा मुद्दा चांगलाच गाजला.
या बैठकीत महावितरण कंपनी व ठेकेदार एजन्सी यांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढण्यात आले. आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून या स्मार्ट वीज मिटरच्या कामाविरोधात साखळी उपोषण छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच त्याची दिशा ठरवली जाणार आहे. या आंदोलनात आ. शेखर निकम, आ. भास्कर जाधव, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकते आणि ग्रामस्थ यांनाही निमंत्रित करण्याचे ठरले. तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात स्मार्ट वीज मिटरचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल आ. जाधव व आ. निकम यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. या बरोबरच या बैठकीत तहसीलदार कार्यालय, वन विभाग, बीएसएनल टॉवर, जिल्हा परिषद सीईओ रत्नागिरी आदी विभागातील विविध विषयांवर व प्रश्नांवरही चर्चा करण्यात आली. तसेच या बैठकीत मालघरचे सरपंच सुनिल वाजे, बिवली सरपंच नेहा वाजे यांची नवीन सदस्य म्हणून समितीत बिनविरोध निवड करण्यात आली. या बैठकीला सरपंच संघटनेचे अध्यक्ष योगेश शिर्के यांच्यासह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.













