न्हावेली (प्रतिनिधी श्रेयस गावडे):
न्हावेली पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील शेतजमिनीत असलेले सुमारे १० ते १२ जुने आणि जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्यासाठी महावितरणने सकारात्मक पाऊल उचलले आहे. पावसाळ्यापूर्वी हे पोल बदलून देण्याचे आश्वासन महावितरणचे उपअभियंता यांनी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिले आहे. न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, प्रशासनाने वीजवाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याची मागणीही मान्य केली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि संभाव्य जीवितहानी टाळता यावी यासाठी ग्रामस्थांनी महावितरणकडे दाद मागितली होती. पार्सेकरवाडी ते कुंभारभाट दरम्यानचे सर्व १०-१२ जीर्ण पोल तातडीने बदलण्यात यावेत आणि पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्यांना अडथळा ठरणारी झाडे व फांद्यांची छाटणी करून वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे महावितरणचे उपअभियंता द्राक्षे यांच्याकडे करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य पटवून देण्यात आले.
उपअभियंता द्राक्षे यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत या भागाचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी नवीन पोल बसवून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. या प्रसंगी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासोबत प्रथमेश अरोंडेकर, अमोल पार्सेकर, सौरभ पार्सेकर, ओम पार्सेकर, सीताराम परब व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. महावितरणच्या या आश्वासनामुळे न्हावेली गावातील नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे.











