पाल गावात संभाव्य पाणी टंचाई होऊ नये यासाठी ग्रामपंचायतने कंबर कसली 

१० वनराई बंधारे बांधले : सभापती, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांची भेट

वेंगुर्ले : दाजी नाईक 

वेंगुर्ले तालुक्यातील पाल गावात संभाव्य पाणी टंचाई होऊ नये यासाठी पाल ग्रामपंचायतीच्या वतीने गावात पाणी अडविण्यासाठी कंबर कसली आहे. गावातील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, महिला बचत गट यांच्या सहकार्याने आतापर्यंत तब्बल १० वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत. आज मंगळवारी गावातील काही बंधारा बांधण्याच्या ठिकाणी वेंगुर्ला पं. स. सभापती शंकर घारे, तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. सदस्य सुजाता पडवळ यांनी भेट देऊन बंधाऱ्यांची पाहणी केली.

सर्वप्रथम पाल गावची ग्रामदेवता मूळ भूमिका देवीला श्रीफळ ठेवून आगामी तालुक्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. यावेळी याच श्री देवी भूमीका मंदिर शेजारी असलेला मुख्य बंधारा, मिरखेलवाडीतील बंधारा व श्री झेंडोबा मंदिर नजिकचा बंधारा घालण्यात आला. तसेच गावातील जलतारा खड्याची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. ग्रामपंचायतीने जलसंवर्धनासाठी केलेल्या या कामाचेही अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले. यावेळी सरपंच कावेरी गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, पाल सोसायटी चेअरमन कमलेश गावडे, ग्राम पंचायत अधिकारी अमर गाडेकर, ग्रा. प. सदस्य प्रदीप मुळीक, श्रीकांत गावडे, विनिता गावडे, श्यामल केरकर, स्नेहल पालकर, सीआरपी संपदा पिंगुळकर, सुचिता नाईक, पोलीस पाटील ऋतिका नाईक, आशा सेविका राजश्री पालकर, तंटामुक्ती अध्यक्ष विलास गावडे, माजी सरपंच राजाराम गावडे, ग्रामस्थ संदीप नाईक, रमेश आमडोस्कर, योगेश कोळसुळकर, कर्मचारी सत्यविजय गावडे, नीलिमा गावडे, मनोहर गावडे, द्वारकानाथ गावडे, वरद गोडबोले, महिला बचत गट, कल्पतरु ग्रामसंघ, आशा, अंगणवाडीसेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.