सातार्डा ग्रामपंचायतीचा ‘एक तरी झाड लावा’ संकल्प

सरपंच बाळू प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण

​सावंतवाडी । प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक तरी झाड लावा’ हा स्तुत्य संकल्प करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ सातार्डा ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला.

​पर्यावरण दिनाचे महत्त्व पटवून देताना सरपंच बाळू प्रभू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “सध्याच्या काळात पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज बनली आहे. मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी चालवलेली वृक्षतोड तातडीने थांबवणे आवश्यक आहे. निसर्गाचे आणि धरतीचे आपल्यावर मोठे ऋण आहेत, हे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे.” निसर्गाचे रक्षण करणे हे केवळ शासनाचे काम नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

​याप्रसंगी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी कुणाल मसगे, उपसरपंच विशाखा पारीपत्ये, सदस्य शालिनी राऊळ, योगेश गोवेकर, संतोष गोवेकर, डॉ. एमगेकर, पोलीस पाटील विनीता मयेकर, मनाली पेडणेकर, प्रमिला यमगेकर, ग्रामसखी स्नेहा पारिपत्ये यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून गाव हिरवेगार करण्याचा आणि लावलेली झाडे जगवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.