नगरसेवकांचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी एस.टी. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंत सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत असून ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, तसेच परिसरातील धोकादायक झाड तातडीने तोडण्यात यावे, अशी मागणी सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभापती मोहिनी मडगावकर व नगरसेवक आनंद नेवगी यांनी आगार व्यवस्थापकांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात लोकप्रतिनिधींनी बसस्थानक परिसरातील दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. बसस्थानक आवारातील चितारआळी येथून वैशवाडा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची संरक्षक भिंत सध्या पूर्णपणे कोसळण्याच्या अवस्थेत आहे. आगामी पावसाळ्यात ही भिंत अचानक रस्त्यावर कोसळून मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय, याच भिंतीलगत असलेले एक मोठे झाडही धोकादायक बनले असून, ते शेजारील लोकवस्तीमधील घरांवर कोसळण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
या गंभीर समस्येबाबत यापूर्वीही आगार प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा थेट आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. भविष्यात या ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास आणि त्यामुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित आगार प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा नगरसेवक आनंद नेवगी व नगरसेविका मोहिनी मडगावकर यांनी दिला आहे.
हे निवेदन देताना भाजप बुथ अध्यक्ष राघू चितारी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. आता यावर आगार प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.













