चिपळूण (प्रतिनिधी) : न. ए. सोसायटीच्या डी. बी. जे. महाविद्यालयात चालणाऱ्या भाषा अध्ययन केंद्रामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी जर्मन आणि जपानी भाषा अभ्यासवर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २०१५ पासून कार्यरत असलेल्या या केंद्राचा उद्देश विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यवसायाभिमुख शिक्षण देणे हाच राहिला आहे. महाविद्यालयास नुकतीच स्वायत्तता प्राप्त झाल्यानंतर अशा उपक्रमांना अधिक प्रोत्साहन दिले जात आहे. २०२६-२७ या वर्षासाठी जर्मन भाषा वर्ग लवकरच सुरु होणार आहे.
यावर्षी जर्मन कोर्स प्राथमिक (A1) तसेच द्वितीय (A2)अशा दोन पातळ्यांवर सुरु होत आहे.हे कोर्स चार ते पाच महिन्यात पूर्ण होतात व त्यानंतर ग्योथे इन्स्टिटय़ूट या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या जर्मन भाषा परिक्षेला बसता येते.प्राथमिक वर्गासाठी १६ वर्ष पूर्ण झालेली व्यक्ती या भाषावर्गासाठी पात्र आहे. द्वितीय वर्गासाठी १६ वर्ष पूर्ण असणारी व प्राथमिक वर्गाचा अभ्यास पूर्ण केलेली व्यक्ती प्रवेश घेऊ शकते. जर्मन भाषा अभ्यासक्रम डी. बी.जे महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थ्यी व बाहेरील सर्वांसाठी खुला आहे. अभ्यासवर्ग महाविद्यालयात आठवड्यातून तीन /चार दिवस संध्याकाळी घेतला जातो. हा कोर्स इंजिनिअरिंग, फार्मसी, वाणिज्य, व्यवस्थापन शिकणाऱ्यांना नोकरीसाठी लाभदायक आहे. जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे, भाषांतर क्षेत्रात काम करु इच्छिणारे यांनाही हा कोर्स उपयुक्त आहे. सथ्या जर्मनी मध्ये कुशल मनुष्यबळाची कमतरता आहे. A1 व A2 हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना तिथे नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. याबरोबरच जपानी भाषा अभ्यासवर्ग साठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हा वर्ग सुमारे एक वर्ष कालावधीचा असून त्यानंतर विद्यार्थ्यांना जपान फाउंडेशन व जपान एज्युकेशन अँड एक्सचेंज सर्व्हिसेस यांच्यामार्फत घेतल्या जाणाऱ्या N5 पातळीच्या जपानी भाषा पात्रता परीक्षेला बसण्याची संधी मिळते. जपानी नागरिक नसलेली कोणतीही व्यक्ती या अभ्यासवर्गासाठी पात्र आहे. हे वर्ग आठवड्यातून तीन ते चार दिवस दुपारी किंवा संध्याकाळी ऑनलाइन आणि ऑफलाइन अश्या दोन्ही माध्यमामध्ये घेतले जतील. आयटी, सीएस, इंजिनिअरिंग, डेटा सायन्स शिकणाऱ्या तसेच सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासवर्ग विशेषतः फायदेशीर ठरेल. डी. बी. जे. महाविद्यालयातील तसेच बाहेरील सर्व इच्छुकांसाठी ह्या वर्गांसाठी प्रवेश खुला आहे.
हे दोन्ही वर्ग महाविद्यालयातील तसेच बाहेरील तज्ञ आणि अनुभवी प्रशिक्षकांमार्फत घेतले जातता. जर्मन व जपानी भाषा वर्गा साठी प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्यांनी अधिक महितीसाठी न. ए. सोसायटीच्या कार्यालयामध्ये अथवा महाविद्यालयामधील इंग्रजी विभागामध्ये संपर्क साधावा. या दोन्ही भाषा अभ्यासवर्गांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील भाषा शिक्षणाची संधी मिळणार असून, त्यांच्या करिअरमध्ये नवे क्षितिज खुले होणार आहे. तरी यासंधीचा जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे आणि प्राचार्य डॉ. माधव बापट यांनी केले आहे.












