सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार 72 गुणवत्ता व TET धारक केंद्रप्रमुख!

मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भरती प्रक्रियेला वेग

स्वप्निल कदम- कुडाळ :
विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे केंद्रप्रमुख पदांच्या 50 टक्के जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 3 व 4 फेब्रुवारी 2026 रोजी संगणकीय पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवून परीक्षेच्या वेळी TET पात्र असलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाने पात्र ठरविले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 72 तर राज्यातील एकूण 2410 शिक्षक या प्रक्रियेत पात्र ठरले आहेत. दरम्यान, या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र, राज्यातील 85 ते 90 टक्के केंद्रप्रमुख पदे रिक्त असल्याने शिक्षण व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने 26 मे 2026 रोजी भरती प्रक्रियेवरील तात्पुरती स्थगिती उठवून भरतीस हिरवा कंदील दिला.

त्यानुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्गने 13 जून 2026 रोजी अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात गुणवत्ता व TET पात्रता धारक 72 नवीन केंद्रप्रमुखांची नियुक्ती होणार असून, सध्या अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे.

तसेच केंद्रप्रमुख पदांवरील नियुक्त्यांमुळे रिक्त होणाऱ्या 72 शिक्षक पदांसाठी ‘पवित्र’ पोर्टलद्वारे नवीन शिक्षक भरतीचा मार्गही मोकळा होणार आहे. जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेला यामुळे मोठा दिलासा मिळणार असून शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.