नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी ओरोस खुर्द येथे ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’

जीवामृत, श्री पद्धती व भात पीक व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक; पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष गावडे यांचा गौरव

स्वप्निल कदम -कुडाळ :         महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘क्रॉपसॅप’ (सन २०२६-२७) अभियानांतर्गत नैसर्गिक शेतीचा प्रसार व शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने ओरोस खुर्द येथे ‘नैसर्गिक शेती आधारित शेतकऱ्यांची शेतीशाळा’ उत्साहात पार पडली. “रासायनिक खतांना द्या फाटा, नैसर्गिक शेतीने सुधारा उत्पन्नाचा वाटा” हा संदेश देत कृषी विभागाने शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे महत्त्व आणि आधुनिक तंत्रज्ञानाची प्रभावी माहिती दिली.

मा. तालुका कृषी अधिकारी भास्कर चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शेतीशाळेत जमिनीची सुपीकता वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी जीवामृताचा वापर किती उपयुक्त आहे, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जीवामृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी संतोष गावडे यांचा उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते श्रीफळ व आंब्याचे कलम देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या शेतीतील प्रयोगशील वृत्तीचा गौरव करताना इतर शेतकऱ्यांनीही नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन करण्यात आले.

यानंतर सहाय्यक कृषी अधिकारी प्रिया खरवडे यांनी भात पिकातील संतुलित खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेतीची तत्त्वे आणि जीवामृताच्या वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सेवक निखिल ढोकणे यांनी ‘श्री’ पद्धतीने भात लागवड केल्यास कमी बियाणे, कमी पाणी आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळू शकते, याबाबत तांत्रिक माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना पुरस्कारप्राप्त शेतकरी संतोष गावडे म्हणाले, “शेतीमध्ये सातत्याने प्रयोग केल्यानंतर जीवामृताचा परिणाम अत्यंत सकारात्मक असल्याचा अनुभव आला आहे. गाईचे शेण व गोमूत्रापासून तयार होणारे हे सेंद्रिय द्रवरूप खत जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवते, मातीचा पोत सुधारते आणि पिकांची उत्पादनक्षमता नैसर्गिकरीत्या वाढविण्यास मदत करते. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेतीचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे.”

या शेतीशाळेला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नैसर्गिक शेती, जीवामृत निर्मिती, भात पीक व्यवस्थापन तसेच श्री पद्धतीच्या लागवडीविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक, कमी खर्चिक आणि शाश्वत शेतीच्या दिशेने शेतकरी मोठ्या प्रमाणावर पुढे येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.