रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात वार्षिक सर्वसाधारण बदल्या; 115 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील वार्षिक सर्वसाधारण बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून विविध संवर्गांतील एकूण 115 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मंजुरी देण्यात आली आहे. 15 जून 2026 रोजी ही प्रक्रिया राबविण्यात आली.

यामध्ये पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक तसेच पोलीस शिपाई या संवर्गांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या बदल्यांची कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे होते. अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी सदस्य म्हणून तर प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) मुख्तार शेख यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिले.

बदली प्रक्रियेदरम्यान कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमांचा तसेच प्रशासकीय गरजांचा विचार करून पारदर्शक आणि समुपदेशनाच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला. आस्थापना मंडळाच्या शिफारशींनुसार या बदल्या त्वरित प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय बदल्यांमध्ये 23 सहायक पोलीस फौजदार, 20 पोलीस हवालदार, 1 पोलीस नाईक आणि 21 पोलीस शिपाई यांचा समावेश असून, प्रशासकीय कारणास्तव व समुपदेशनाद्वारे 37 पोलीस अंमलदारांच्या बदल्या एक वर्षासाठी स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विभागातील एकूण 102 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला. याशिवाय चालक संवर्गात 1 पोलीस शिपायाची बदली करण्यात आली असून 12 अंमलदारांच्या बदल्या एक वर्षासाठी स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. चालक संवर्गातील एकूण 13 प्रकरणांचा समावेश होता.

नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणाऱ्या सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शुभेच्छा दिल्या असून, या बदल्यांमुळे जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजात अधिक कार्यक्षमता आणि गतिमानता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.