पोफळी : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्राथमिक शाळा, पोफळी येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या परिसरात आनंद, उत्साह आणि नव चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री परशुराम तसेच विद्येची देवता श्री सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, औक्षण करून व फुलांची उधळण करत उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे उमटवून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची मंगलमय सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी पंचायत समिती सदस्या,सौ.स्नेहाताई साळवी,माजी जिल्हा परिषद सदस्या,सौ.सुचिताताई सुवार,ग्रामपंचायत पोफळीचे माननीय सरपंच उस्मानभाई सय्यद, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य श्री वैभवजी पवार, सामाजिक कार्यकर्ते श्रीरामभाऊ पवार, ग्रामपंचायत
सदस्या, श्रीम.तेजस्विनी मानकर, सो.सकपाळ वहिनी,सखी सावित्री समिती अध्यक्षा, सौ.रोहिणी गुळवे,आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी प्रशालेकडून सर्व विद्यार्थ्यांना पेढे वाटण्यात येऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या,तसेच शाळेच्या पहिल्याच दिवशी समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण दिसून आले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी इयत्ता पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण करून घेण्यात आले. “एक विद्यार्थी – एक झाड” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिवसभर विविध स्वागतपर उपक्रम, खेळ, संवाद आणि आनंददायी वातावरणामुळे विद्यार्थ्यांचा शाळेतील पहिला दिवस अविस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या समाधानातून या उपक्रमाचे यश स्पष्टपणे दिसून आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात ज्ञान, संस्कार, पर्यावरणप्रेम आणि आनंददायी वातावरणात झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून येणारे संपूर्ण शैक्षणिक वर्ष यशस्वी व गुणवत्तापूर्ण ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













