भारत सरकार मान्यता प्राप्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी), नाशिक यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र विद्या पदविका परीक्षेत पत्रकार निसार महंमद शेख यांनी प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे चिपळूण तालुक्यासह शिरगाव गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
मे २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत त्यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत पत्रकारिता क्षेत्रातील आपले ज्ञान, कौशल्य आणि अभ्यासू वृत्ती सिद्ध केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था (अकॅडमी) यांच्या वतीने त्यांना वृत्तपत्र विद्या पदविका प्रदान करण्यात आली.
गेली २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असलेले निसार महंमद शेख हे दैनिक सागर तसेच नवराष्ट्र चॅनलचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि लोकहिताच्या विविध विषयांवर सातत्याने वृत्तांकन करून त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी तसेच ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. कृत्तिका संदीप मराठे यांनी त्यांचे अभिनंदन करून भविष्यातही पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. निसार शेख यांच्या या यशामुळे शिरगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.












